स्वातंत्र्य सेनानी : बाबुराव मुटकुळे
प्रा. अलोक पवार
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. भारतामध्ये सर्व भारतीय आनंद व्यक्त करीत होते. नेहरू, महात्मा गांधी आणि बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांना यश लाभले होते. मोठी लढाई लढून सर्व जण ऑगस्ट महिन्यात थकल्या भागल्या चेहऱ्यांनी दिवाळी साजरे करीत होते. तरीही हैद्राबाद, जुनागड आणि काश्मीर सारखी संस्थाने स्वतंत्र असलेल्या भारतामध्ये सहभागी होण्यास तयार नव्हती. म्हणजे एक बाजूला संपूर्ण भारतीयांनी स्वातंत्र्याचा आनंद लुटायचा मात्र या तीन संस्थान परिसरातील व्यक्तींनी संस्थानाच्या आदेशाने आपले जीवन व्यक्तीत करायचे. एकंदरीत १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस या तीनही संस्थांनासाठी स्वातंत्रांचा दिवस नव्हताच मुळी.
हैद्राबाद या संस्थानावर निजाम राज्य करीत होता. निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुदौला निजाम उल- मूल्क आसफजाह या या संस्थानाचा अधिपती होता. बऱ्याच जणांनी हा भाग भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केला होता. मात्र निजामाची चाकरी करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ कशी बंद होईल याकडे लक्ष देऊन होती. निजामाच्या या संस्थानात महाराष्ट्र मधील सध्याचा मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. एका बाजूला निजामशाही आणि दुसऱ्या बाजूला लढाऊ जवान अशी सशस्त्र लढाई सुरू झाली होती.
आता थोडे फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. याच मराठवाड्यामधील एक जिल्हा बीड. त्यामधील मांडवा, तालुका आष्टी मध्ये यशोदा आणि हिराजी मुटकुळे या दाम्पत्याच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले. लहानपणापासून हे अपत्य म्हणजेच बाबू हे अभ्यासात हुशार, सातवी पर्यंत चे शिक्षण घेऊन, मोदी लिपीचा अभ्यास करून एकदम चोखंदळ असा बाबू याला निजामाच्या अत्याचाऱ्याच्या बातम्या कानावर येत होता. स्वातंत्र्याच्या उमेदीच्या बातम्या स्वातंत्र्य प्राप्त होऊनही आपण दडपशाहीखाली का जगतो आहोत या गोष्टी आतल्या आत खात होत्या. नीटसा तरुण न झालेल्या या युवकाने या हैद्राबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचा भाग निजामाच्या तावडीतून सोडवायचा आणि त्यात आपला सहभाग हवाच हे स्वप्न अगदी दिवसाही डोळ्यासमोर दिसू लागले. आणि हा युवक बीड मधील रोहिल्यांना जेरीस आणणाऱ्या विठ्ठलराव काटकर यांच्या मार्गदर्शनाने या मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झाला. घरची बेताची परिस्थिती असूनही आता मागे हटायाचे नाही, असे म्हणून घरावर तुळशीपत्र ठेवून निजामशाही विरुद्धच्या लढ्यात बाबू सहभागी झाला. संपूर्ण गावाला आदर्श राहील असा बाबू हा लढताना निजामाची गुलामगिरी करणाऱ्या पोलिसांना सापडला तेंव्हा अगदी निजामाच्या कैदेत सुद्धा जाऊन आला. त्या काळच्या आण्याची किंमत होती कैदेतून सुटण्याची. सुटून सुद्धा गप्प बसणारा तो बाबू कसला. मातीला निजामरुपी कसायाच्या ताब्यातून मोकळे करूनच सोडायचे हे ठाम मत होते. आणि म्हणून परत कंबर कसून शर्तीने युद्धात सहभागी झाले. मराठवाड्याच्या कानाकोऱ्यातून ही लढत सुरू होती. तब्बल तेरा महिने लढतीच्या अंती शेवटी निजामाने हार पत्करली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने खुद्द शरणागती पत्करली. पोलादपूरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा भाग भारतात विलीनीकरणाची प्रक्रिया पार पाडली. हा दिवस एक नवीन यशाचा तुरा रोवणारा होता. बऱ्याच युवकांनी या वेगळ्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला होता त्यातील एक युवक म्हणजे बाबू...आमचे बाबुराव हिराजी मुटकुळे.
(मी बाबू म्हणतोय ते म्हणजे आमचे माननीय पणजोबा. त्यांचा इतिहास सांगण्यासाठी त्यांना लहानपणीच्या एकेरी नावाने संबोधले. त्याबद्दल माफी असावी)
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते बाबुरावजी मुटकुळे यांना त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम पूर्ण झाल्यावर आपली देशसेवा थांबवली नाही. पुढे देखील हीच सेवा अविरत चालू ठेवली. सरकारकडून चरितार्थ प्राप्त झालेल्या रास्त धान्याच्या दुकानात त्यांनी नेहमी नियमांनी विक्री केली. कोणत्याही परिस्थितीत लोकांना लुटायचे नाही ही त्यांची शिस्त होती. आपल्या मुलांना म्हणजे अशोक आणि रामहरी मुटकुळे तर मुली सुमन, नंदा आणि उषा यांना देखील हीच शिकवण होती.
गावातील बऱ्याच लोकांना बाबुरावजी यांनी दृष्टी मिळवून देण्याचे काम केले होते. दरवर्षी गावातील मोतीबिंदू आलेल्या ग्रामस्थांना घेऊन पुण्याला यायचे. पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटलमध्ये मध्ये या ग्रामस्थांच्या मोतिबिंदूचे मोफत ऑपरेशन त्यांच्यामुळे मोफत व्हायचे. अनेक आरोग्य शिबीर संपन्न करण्यासाठी ते प्रयत्न करायचे. पुण्यात जाण्यासाठी थोडा फार जो खर्च व्हायचा तो देखील बाबुरावजी आपल्या स्वखर्चाने करीत. त्यांच्या म्हातारपणातही त्यांनी ही सेवा अविरत ठेवली होती. म्हातारपण असे म्हणणे खरे तर चुकीचे होईल. कारण वय जरी जास्त असले तरीही त्याची काम करण्याची जिद्द तीच होती. त्यांच्यात अजूनही निजामाच्या विरुद्ध लढणारा तरुण संचार करीत होता. या वयात ते मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष पद भूषवित होते.
माझी आणि त्यांची भेट २०१९ मध्ये झाली. मी बीडच्या फिरतीवर होतो. फिरती वर म्हणजे माझ्या एका विद्यार्थ्यांच्या घरी आलो होतो. त्यांच्या कन्या म्हणजे आमची आज्जी सुमन यांच्याकडून एका फोन वर मी गावाला आलोय असे कळल्यावर ते स्वतः बसने मला भेटायला आले होते. त्यांच्या ९१ व्या वयात त्यांना मी भेटायला जाणे अपेक्षित होते पण ते स्वतः त्यांचे पुरस्कार आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी केल्याचे जीवंत पुरस्कार त्यांनी मला दाखवायला आणले होते. त्यांची प्रमाणपत्र, त्याचे पुरस्कार, त्यांचे फोटो एक एक करून त्यांच्या पिशवीतून बाहेर पडत होते. डोळे अगदी दिपून जात होते. मे महिन्यातल्या त्या दिवसात गरम होत होते म्हणून आजोबा चक्क आदिनाथाच्या मंदिरात येऊन त्यांचा संपूर्ण इतिहास मला सांगत होते. निजामाचा काळ, त्याच्या काळातली परिस्थिती, तो लढा सर्व डोळ्यासमोर उभा राहत होता. मी एक स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढे उभा आहे, मी तो इतिहास माझ्या कानाने ऐकत होतो माझे डोळे, कान आणि संपूर्ण शरीरच दिपले होते.
आजोबांनी ती निजमाविरुद्धची लढाई, किंवा लोकांची सेवा करणे इथे थांबायचं असे चालून कसे जमणार म्हणून घरच्या प्रत्येकाच्या पटवूज देऊन त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला. देहदानाचा अर्ज भरून मेल्यावरही आपण राष्ट्रसेवा करू शकतो. माझा जन्मच राष्ट्रासाठी झाला आहे. मग माझा मृत्यू देखील राष्ट्रासाठी आहे हे त्यांचं मत होतं. घरच्या सर्वांनी हे स्वीकारलं होत. त्यांच्या पंतीचे लग्न पाहावे हे त्यांचं स्वप्न होते. म्हणून त्यांनी उत्तम वराची शोधाशोध सुरू केली होती. अखेर त्यांना हवे तसा वर भेटल्यावर साखरपुडा झाला.
२०२० मध्ये भारतामध्ये कोरोना नामक भयानक विषाणूने शिरकाव केला. सुरवातीला फक्त शहरांतच हा कोरोना होता. नंतर हा खेड्यापाड्यात पोहोचलेल्या हा कोरोना तेंव्हा आजोबांच्या मांडाव्यात पण हा कोरोना पोहोचला. घरातून लग्नाच्या तयारीला बाहेर सर्वांनी नका जाऊ तरीही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून स्वतःची मदत असावी म्हणून आजोबांनी बँकेत गेल्यावर त्यांना कोरोनांन ग्रासलं. आठ दिवस कोरोनाशी झुंज देऊन आजोबा बरे झाले मात्र २९ एप्रिल २०२१ रोजी रात्री त्यांचे हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
आजोबांची इच्छा अपूर्ण राहिली. कोरोना झालेल्या शरीराचे देहदान होऊ शकत नाही त्यामुळे आजोबांचे देहदान झालं नाही. आजोबांचं शरीर थांबल, त्यांचे डोळे मिटले गेले. पण त्यांचा विचार फक्त राष्ट्रभक्ती हाच होता. तो कसा थांबणार. आज कोरोना मुळे त्यांचं शरीर देशाला कामाला नाही आलं. पण त्यांची अस्मिता जपायचे ठरवले तर राष्ट्रहित आजही जपले जाऊ शकते. त्यांचे विचार आजही प्रत्येक तरुणांना कधीही म्हातारे न करणारे असे होते.
आजोबा तुम्ही आमच्यातून गेले पण तुमचे कार्य आणि विचार, तुमची प्रेरणा अमर राहणार आहे.
......
