वाणिज्यमहर्षी डॉ. बाबासाहेब सांगळे
प्रा. अलोक पवार
आयुष्यात बऱ्याच गोष्टी माणसांना सहजपणे मिळतात तर काही जणांना त्या मेहनतीने कमवाव्या लागतात. आता कमविणे म्हणजे फक्त पैसा कमावणे इतकेच नव्हे तर ज्ञानसाधना करून ज्ञानार्जन करुन अधिकाधिक ज्ञान संपादन कसे करता येईल आणि पसरवता येईल ही देखील आयुष्याची एक जमापुंजी असते. पण ही जमापुंजी मिळवणे देखील तितके सोप्पे नसते हे आमच्या बाबासाहेब सांगळे सरांच्या जीवन प्रवासावरुन दिसून येते.
१ जून १९५९ मध्ये बाबाजींचा जन्म वंजरवाडी, सोनई, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे झाला. रामभाऊ आणि भीमाबाई यांच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र घरील परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने हे बाळ तरी सुख घरी आणेल म्हणून त्या बालकाचे नाव असे साहेबी थाटाच असले पाहिजे म्हणून नाव 'बाबासाहेब' ठेवण्यात आले. चौथी पर्यंतचे वंजरवाडीच्या शाळेत पूर्ण झाले. शनैश्वर विद्यामंदिरात एस. एस. सी. पूर्ण केले. हे सर्व फक्त दहावी पर्यंतचे शिक्षण पाहिजे तितके सोप्पे नव्हते तर अतिशय खडतर आयुष्य काढले म्हणायला काही हरकत नव्हती. शाळेत जाताना साधारण तीन किलोमीटर चालत जायचे, इतक्या लांबचा प्रवास देखील अनवाणी करायचा, आठवड्याला अंगावर कपडे देखील वापरायला नाही एकच सदरा पुन्हा धुवून धुवून तोच वापरायचा.
पुढे नगरच्या रेसिडेन्सी स्कूल मध्ये अकरावी पूर्ण केली. त्यानंतर अगदी एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण नगरच्याच न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पूर्ण केले. हे शिक्षण मेरिट स्कॉलरशिप वर झाले. हे शिक्षण घेत असताना बाबाजींना दिशा मिळाली असे म्हणायला काही हरकत नाही. महाविद्यालयात असताना आपण स्वतःला पटवून दिले पाहिजे. आपला मुद्दा वर्गात मांडला पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. या मुद्द्याला महाविद्यालयीन मित्रांनी साथ दिली आणि हाच युवक महाविद्यालय प्रतिनिधी झाला. फक्त महाविद्यालय प्रतिनिधी नाही तर हीच घोडदौड अगदी पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ प्रतिनिधी बनण्यापर्यंत गेली. त्यावेळी हे विद्यापीठ प्रतिनिधी बनणे हे इतके सोप्पे नव्हते. स्पर्धा भरपूर होती. पण आपल्या नैतृत्व शैलीने हा युवक चमकत होता. एकंदरीत आता अजिबात थांबायचे नाही असे बाबाजींनी ठरवले. आपले आई - वडील घरच्यांनी आपण जे दिवस पाहिले आहेत ते दिवस आता बदलायचे म्हणून अगदी कंबर करायची तसे ठरवले आणि पुढील वर्षी लगेच अहमदनगर च्या न्यू लॉ महाविद्यालयात प्रवेश घेतला.
पण फक्त शिकून पोट कसे भरणार म्हणून, नेवासे मधील ज्ञानेश्वर महाविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये नोकरी मिळवली आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर शिकवायला सुरवात केली. एक वर्षानंतर पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या पांडवनगर महाविद्यालय येथे पार्ट टाइम नोकरीला रुजू केले. पुण्यात संधी अधिकाधिक मिळू शकतील हे विद्यापीठ प्रतिनिधी असतानाच जाणवले होते. सोबत शिक्षण देखील थांबवायचे नव्हते म्हणून लॉच्या दुसऱ्या वर्षासाठी पुण्यातच आयएलएस लॉ कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. लॉ पूर्ण केले. पुढे डिप्लोमा इन हायर एज्युकेशन, बीएड देखील पूर्ण केले.
पुढे बाबाजी १९८९ मध्ये पुणे विद्यापीठाच्या बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या अभ्यास मंडळावर प्रथम निवडून आले. आणि इथूनच होती पुणे विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या राजकारणातली घोडदौड सुरू झाली. या काळात निर्णय घेणे, अभ्यासक्रम बदलणे या अनेक गोष्टीत त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. २००७ साली नरसिंहन समिती वर डॉक्टरेट पूर्ण केले आणि आता बाबाजी डॉ. बाबासाहेब सांगळे झाले. हा तोच विद्यार्थी होता जो शाळेत ज्ञानसाधना करण्यासाठी शाळेत अनवाणी जायचा. हा तोच विद्यार्थी होता जो हलाखीच्या दिवसात आपली परिस्थिती बदलेल याचे स्वप्न बघत होता.
२००० साली विद्यापीठाची 'अधिष्ठाता' पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत अवघ्या एक मताने सांगळे सर हरले. मात्र हीच ती वेळ होती ज्यात सरांनी मनाशी निश्चय केला की पुढील निवडणुकीत विजय हा झालाच पाहिजे. आणि शेवटी भरपूर प्रयत्नांनी २००६ मध्ये सांगळे सर यांनी पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेची अधिष्ठाता या पदाची जवाबदारी धुरा स्वीकारली. आणि वाणिज्य शाखा अजून कशी विस्तारित करता येईल याकडे अधिकाधिक भर दिला. विद्यापीठात स्वतंत्र वाणिज्य शाखा कार्यरत केली. म्हणजे वाणिज्य विषयाची धुरा आता वेगळी सांभाळली गेली. पुणे विद्यापीठात वाणिज्य विभागाची प्रशस्त स्वतंत्र इमारत असावी तिथे विद्यार्थ्यांनी वाणिज्यच्या अभ्यासाची ज्ञानसाधना करावी त्यांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळाव्यात या प्रयत्नात त्यांनी इमारतीचा प्रस्ताव दाखल केला. केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या या वास्तूचे भूमिपूजन केले. बघता बघता मनातील ही इमारत पूर्ण झाली. नवीन गरजेनुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक उत्तम प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी नवनवीन अभ्यासक्रम सांगळे सरांनी याच काळात सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न केले. त्याकाळी कॉम्पुटर चा अभ्यास फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग चेच विद्यार्थी करीत होते. मात्र वाणिज्य शाखेतील विद्यार्थी देखील संगणकाचा अभ्यास करू शकतो ही संकल्पना डोक्यात घेतली. मॅनेजमेंट चे धडे हे पदव्युत्तर शाखेत गिरविण्यापेक्षा पदवी करीत असतानाच गिरवले गेले तर अधिकाधिक उत्तम होऊ शकते. या सर्व भारतीय शिक्षण प्रणाली अधिकाधिक उत्तम करून आणि पुणेरी शिक्षणाला, पुणे विद्यापीठाला जे ऑक्सफोर्ड ऑफ इस्ट म्हणले ते नाव अजून उंचवायला बीसीए, बीबीए आणि बीबीएम आयबी असे अनुक्रमे कॉम्प्युटर, व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे पदवी अभ्यासक्रम सुरू केले. एकदंरीत सर्व अभ्यासक्रम तयार करायचे, शिक्षकांच्या चर्चा घडवून आणायच्या, काय महत्वाचे आणि काय फायद्याचे या गोष्टींचा अभ्यास सांगळे सरांनी सुरू केला. मला एकदम छान आठवते त्या काळात अगदी पायाला भोवरा बांधावा ना तसा सांगळे सरांचा दिनक्रम असायचा. विद्यापीठात, अनेक महाविद्यालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी वाणिज्य शाखेची व्याप्ती कशी वाढेल याकडे सांगळे सरांनी अगदी स्वतःहून लक्ष दिले होते. त्याकाळी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये बीकॉम सोबत या अभ्यासक्रमांना देखील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शविली होती. आमची जेंव्हा अभ्यासक्रम निर्मितीची बैठक असायची ना तेंव्हा मी अगदी पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसायचो. सर आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यासक्रम कसा पोहोचवायचा याचे इत्यंभूत मार्गदर्शन करायचे. छोट्या छोट्या गोष्टींकडे ते जातीने लक्ष द्यायचे. अधिष्ठाता असतानाच आणखी एक महत्वाची बाब सरांनी केली ते म्हणजे पीएचडी मार्गदर्शक अधिकाधिक वाढतील याकडेही लक्ष दिले. काही मार्गदर्शकांच्या अडचणी निर्माण झाल्यावर असे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी स्वतः मार्गदर्शन करून त्यांचे पीएचडी मार्गी लावले. बऱ्याच कॉलेज मध्ये कमिटी वर जाऊन विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचे कामही पूर्ण केले. त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात कार्यरत असताना महाविद्वयालयाच्या वतीने तसेच पुणे महानगर पालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला. पुणे विद्यापीठाने देखील त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्तेदेखील त्यांना आदर्श शिक्षक या राज्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरीच शैक्षणिक कामे यथेच्छ पूर्ण करण्याचा हा मानद सन्मान होता. सरांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयात बरेच संशोधन पेपर्स लिहिले आहेत. तसेच बऱ्याच पुस्तकांचे देखील लेखन केले आहे. म्हणूनच या उल्लेखनीय जवाबदारी पूर्ण करणाऱ्या सरांचा उल्लेख मी 'वाणिज्यमहर्षी' म्हणून केला
२०१० साली भारतीय जैन संघटनेच्या आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज मध्ये सर प्राचार्य म्हणून रुजू झाले. याच कालावधीत ऑल इंडिया कॉमर्स असोसिएशनच्या एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट कौन्सिल वर निवड झाली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र कॉमर्स असोसिएशन वर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. वाघोली मध्ये बरेच उत्तम उत्तम कार्यक्रम घेतले. सरांनी बाहेरील शिक्षण कसे आहे त्या शिक्षणाला आपल्या इकडे वापरता येईल का ही पडताळणी करण्यासाठी संशोधन पेपर सादरीकरणच्या माध्यमातून परदेश दौरे देखील केले त्यात त्यांनी ऑस्टेलिया, इंग्लड, अमेरिका, बँकॉक, थायलंड, सिंगापूर अशा अनेक देशांना भेटी दिल्या. हा तोच विद्यार्थी होता ज्यांच्याकडे शाळेत जाताना स्वतःच्या चपला नव्हत्या त्यांनी अवकाशात झेप घेतली होती.
२०१८ पासून सर चिंचवड च्या प्रतिभा महाविद्यालयात रुजू झाले. आणि महत्वाचं तर सांगायचेच राहिले. २००७ साली ज्यावेळी बीबीए आणि बीसीए चे अस्तित्व निर्माण झाले तेंव्हा स्वतःचे देखील एखादे महाविद्यालय असावे ही आस्था मनात ठेवून सरांनी पुढाकार घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्याची निर्मिती म्हणजे आमचं स्वराज कॉलेज. मग आजही आमचे छोटेसे महाविद्यालय बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना मदत करते आहे. सरांच्या सहकार्यानेच आमच्या कडे देखील विद्यार्थी बीकॉम, बीसीए, बीबीए, बी.एस्सी. संगणक शास्त्र, एम. कॉम., एमबीए अशा अनेक कोर्सला प्रवेश घेऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करीत आहेत. गरीब घराण्यातील कोणताही विद्यार्थी वंचित राहता कामा नये यासाठी सर सर्वस्वी प्रयत्न करीत आहेत. आम्ही अगदी आम्हाला अवघड वाटणाऱ्या गोष्टींसाठी सरांना फोन केला तरीही सर अगदी समजेल उमजेल अशा भाषेमध्ये फोनवरच समाधानकारक उत्तरं देतात. नवीन काय पुस्तके, उपकरणे खरेदी करायची आहेत अगदी निसंकोचपणे काम करण्याचे उपदेश सर देतात. आणि कामात थोडी जरी चुकी झाली तर कानउघाडणी देखील करण्याचे काम सर करतात. त्यामुळे बऱ्यापैकी सरांकडून गोष्टी शिकायला मिळतात.
हे सर्व मार्गक्रमण करीत असताना सांगळे सरांना मोलाची साथ मिळाली ती म्हणजे त्यांच्या पत्नीची सुनीता सांगळे मॅडमची. एमएस्सी करीत असतानाच लग्न झाले एमएस्सी चे दुसरे वर्ष लग्नानंतर पूर्ण केले. पुढे बी. टेक देखील पूर्ण केले. सर प्राचार्य, अधिष्ठाता असल्याने घरी येणारा गोतावळा कमी नसायचा पण तरीदेखील मॅडमने सर्व गोष्टी अगदी उत्तम प्रकारे सांभाळल्या. त्या सध्या वैयक्तिकरित्या सहारा कन्सल्टंसी सर्विसेस सांभाळत आहेत. सरांच्या मुलाचे सौरभ याचे शिक्षण बीई सिव्हिल, एलएलबी झाले असून तो सध्या प्रॅक्टिस करतो आहे तर मुलगी ऋतुजा बीई मॅकेनिकल करून सध्या एमबीए करते आहे. एकंदरीत घरातील व्यक्ती देखील शिक्षित असले पाहिजेत ही भावना या दोघा नवरा बायकोनी पूर्ण करून दाखवली.
आज १ जून ला सर त्यांच्या वयाची बासष्टी गाठत आहेत. आजही वर्गात बोलायला उभे राहिले तर एखाद्या तरुण उमद्या शिक्षकाला लाजवतील असे सरांचे भाषण असते. 'थांबायचे नाही गड्या थांबायचे नाही..' या उक्तीला अगदी साजेसा सरांचा हा जीवनपट थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण म्हणतात ना, 'पिच्चर तो अभि बाकी हे मेरे दोस्त..' तसेच अजूनही खूप वाणिज्यच्या मैदानावर पैलवान घडवायचे आहेत, खूप गोष्टी करायच्या आहेत आणि मग माझ्यासारख्याला त्या खूप गोष्टी चित्रण करायच्या देखील संधी द्यायच्या आहेत.
अशा आमच्या लाडक्या डॉ. प्राचार्य बाबासाहेब सांगळे सरांना वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा !!!


