Monday, 15 November 2021

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

अलोक पवार

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून आता बरेच वर्ष झाले. हे स्वातंत्र्य कोण्या एकाच्या नाही तर बऱ्याच जणांच्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला प्राप्त झाले. मात्र जेंव्हा आपण या स्वातंत्रांचा विचार करतो तेंव्हा आज अजूनही काही वर्ग हे समाजापासून काही अंशी मागे असे दिसून येतात, ज्यात प्रामुख्याने आदिवासी समाज असूनही आहे दिसून येते. त्यांना शिक्षण, नोकरी यापेक्षाही व्यक्ती म्हणून किंवा निदान मूलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या गोष्टी देखील योग्य वेळी प्राप्त होत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी या सर्व समाजला एक व्यक्तीने खूप जोरदारपणे प्रयत्न केला तो म्हणजे बिरसा मुंडा यांनी.


बिरसा मुंडा हे स्वतः मुंडा या आदिवासी समाजात जन्मलेले. १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये त्यांचा जन्म झारखंड मधील, खुटी जिल्ह्यातील उलिहातू या गावात झाला. जन्माने आदिवासी असलेले बिरसा यांना इतर संप्रदायाला ज्या त्या काळी मिळणाऱ्या सुखसोई होत्या त्या अजिबातच प्राप्त झाल्या नाहीत. आणि त्यातूनही समाज पारतंत्र्यात त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती अवघड होती. त्याकाळी शाळेत प्रवेश घ्यायचा तरी आदिवासी समाजातील मुलांसाठी अशा काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ब्रिटिश कशा प्रकारे आपली पिळवणूक करीत आहेत याचे ज्ञान त्यांना या प्राथमिक शिक्षणातूनच येत गेली. ज्या प्रकारे मिशनरी विद्यालयात शिक्षण घेताना त्यांना आदिवासी समाज किती मागासलेला आहे हे गौरवी करण करून सांगण्यात येऊ लागले तेंव्हा त्यांनी पुन्हा आपल्या आदिवासी समाजात परतले. 

ब्रिटिशांचा त्रास एक बाजूला होताच, दुसऱ्या बाजूला जमीनदार, सावकार, महाजन आणि जहागीरदार या लोकांनी देखील आदिवासींचे शोषण सुरू केले.  आदिवासी लोकांच्या शेतजमिनी देखील हे लोक त्यांच्याकडून कपटी पद्धतीने हस्तक्षेप करून घेऊ लागले. शिक्षणाची व नियमांची माहिती नसल्याने आदिवासी लोक फक्त शोषणाला बळी जात होते. या सर्वांचे नेतृत्व बिरसा यांनी केले. १८९४ मध्ये त्यांनी आदिवासी जमातीचे नेतृत्व करीत जमिनी आणि आपल्या हक्कांच्या विरोधात एका आंदोलनाचे नेतृत्व सरकार विरोधात केले. व याच कालखंडात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातही हल्लाबोल केला.

त्यांनी बऱ्याच ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात महत्वाची भूमिका बजावली. त्या काळच्या ब्रिटिश सरकारने आदिवासींना भडकविण्याच्या बहाण्याने बिरसा मुंडावर ५०० रुपये बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या सामंती प्रणालीचा विरोध केला होता.  जानेवारी १९०० मध्ये डोंबरी नावाच्या गावात या आदिवासी लोकांचा आणि ब्रिटिश लोकांमध्ये एक युद्ध झाले ज्यामध्ये बऱ्याच स्त्रिया आणि लहान मुले देखील मारले गेले. ३ फेब्रुवारी १९०० मध्येच बिरसा यांना अटक झाली. आणि पुढे ९ जून १९०० मध्ये  रांची च्या जेलमध्येच बिरसा यांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडा हे आजही आदिवासी यांच्या लढ्याचे नेतृत्व करीत नसते तर त्यांना त्यांचा हक्क मिळविणारा नेता प्राप्त झाला नसता. आजही आदिवासी समाज इतका पुढारलेला नाही. आपल्या सोबत त्यांनाही स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र शिक्षण, योग्य रोजगार, समाजतील स्थान या सर्वांवर त्यांचा जो हक्क आहे त्या हक्कांना त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बिरसा यांनी सुरवात केली होती. त्याकाळी ब्रिटिश कालीन परिस्थिती होती, मात्र आजही आदिवासी समाज थोडा कुठेतरी मागे दिसतो.

बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल आज जाणून घेतले तर त्यांचे मिशन कुठेतरी आजही चालले पाहिजे असे वाटते. त्यांना आजही बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये देव म्हणून पुजले जाते. त्यांच्या विचारांना अमर उजाळा दिला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त थोडे लिहावेसे वाटले. त्यांच्या कार्याला सलाम. 

Tuesday, 2 November 2021

गणपती, सत्यनारायण, प्रसाद आणि डब्बा

 गणपती, सत्यनारायण, प्रसाद आणि डब्बा

अलोक पवार

जरी या लेखाचे शीर्षक हे गणपती, सत्यनारायण, प्रसाद आणि डब्बा असलं तरी या लेखातून माझ्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्या आजोबांचे नाव ना गणपती आहे, ना सत्यनारायण आणि प्रसाद तर मुळीच नाही. त्यांचे नाव होते दत्तात्रय पवार. माझ्यावर दादांचे प्रचंड प्रेम होते. म्हणजे ते त्यांच्या मुलांना बऱ्याचदा ओरडले असतील मात्र मला कधीच ओरडले नाहीत. कदाचित मी आमच्या पवार घराण्यातील पहिला मुलगा आणि त्यामुळेच मी त्यांच्या लाडोबा असेल.

गणपतीचे दिवस होते. दहा दिवस असलेल्या गणपतीला साधारण आठव्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. त्यावेळी मी लहान आणि आजोबा बऱ्यापैकी भरपूर चालू शकतील असे होते. ठरलं आठव्या दिवशी सत्यनारायण होता तर गणपती बघायला जायचं. आजोबा म्हणजे आम्ही सर्व त्यांना दादा म्हणायचो. दादांना मी डब्बा घेणार आहे म्हणालो. म्हणजे आपण इकडे कुठे पूजा असेल तर प्रसाद घरी आणतो ना सर्वांना तसा आपण जातोय तर प्रसाद आपण घरी आणायचा. दादा हसले मात्र मला ते काहीच बोलू शकले नाहीत. मग एक पिशवीत जरा मोठ्या आकाराच्या फळीवरच्या डब्याला मी काढायला लावले. आम्ही पर्वती दर्शन च्या घरात रहायला होतो. तेथून आमचा मार्गभ्रमण सुरू होणार होते. 

मला अजूनही साजूक तुपातल्या आणि प्रामुख्याने सत्यनारायणाच्या प्रसादाचे भारी कौतुक आहे. कौतुक म्हणजे विशेष प्रेम. लोक घरी सत्यनारायण ठेवतात. सव्वा किलोच्या प्रमाणाने तूप, साखर, रवा यांचा जो घमघमाट असतो ना तो काहीतरी वेगळाच. म्हणजे लोक हातावर तीर्थांनंतर चमच्याने ठेवतात ना फक्त तोंड खवळायचे काम करतात. त्यानंतर काही जण द्रोणात देतात ते म्हणजे चला तुम्हाला जरा एक चमच्यापेक्षा जास्त. आणि काही म्हणतात ना थांब, घरच्यांना पण प्रसाद बांधून देतो त्यांचे उपकार मानावे लागतील. आणखीन एक शेवटचा प्रकार आहे आता कोणी पूजेला नसेल येणार तर आपण प्रसाद जेवणात घेऊया. या शेवटच्या प्रकारच्या मी विशेष प्रेमात आहे. पण असे लोक फार कमी बघावयास भेटतात. आजकाल काही ठिकाणी सत्यनारायण विरोधी भूमिका पार पाडताना बघायला भेटते. म्हणजे मी असे ऐकलेले पुणे विद्यापीठाच्या काही विभागांमध्ये सत्यनारायण पूजा असल्याची. मी बरेचदा तिथेही जाऊन प्रसाद खाल्ला आहे. पण काही कटू लोकांकडून असा कसा सत्यनारायण करू शकतात तेही विद्यापीठात. मला असे वाटते आहे एक तर या लोकांना डायबेटीस असावा किंवा आपल्याकडे एक म्हण आहे ना, 'गाढवाला गुळाची चव काय' त्या अन्वयार्थ हे लोक असे करीत असतील म्हणजे स्वतः प्रसाद खायचा नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचा नाही. असो. 

यासर्व गोष्टींमुळे मी साधारण एक दुसरी तिसरीमध्ये असेल मी फारच खुश होतो. मला एकंदरीतच डब्बा भरवायचा होता. नाही म्हणलं तरी दादांसाठी ते थोडं लाजिरवाणे झाले असावे. आम्ही लक्ष्मी रोड, दगडूशेठ, हत्ती गणपती, असे बऱ्यापैकी सगळे गणपती बघायचे ठरवले होते. दादांना सांगितलं होतं मी सर्व गणपती करायचे. रस्तातले अगदी छोट्या मंडळांचे गणपती पण मी सोडत नव्हतो. लक्ष्मी रोड वर पोहोचून देखील माझा डब्बा भरला नव्हता. म्हणजे कसा भरणार, मी माझ्या वाटणीचा खायचो आणि दादांना भेटलेला प्रसाद त्या डब्ब्यात टाकायला लावायचो. जाऊ यात का परत घरी असे दादा म्हणले तर मी बोलायचो, "दादा डबा भरू दे, चला बरेच गणपती राहिले आहेत". आत्ता या आठवणी आल्या ना की मलाच खूप हसायला येते. नाही म्हणजे एखाद्या नातेवाईकांकडे डब्बा घेऊन गेलो की ठिक आहे. पण लहानपणी मी चक्क गणपती मंडळांना पण सोडले नव्हते. 

आमचा डब्बा साधारण असा पाऊण भरला होता. रात्रभर दादांना चालवून मी प्रसाद खाल्ला होता पण त्यांनी त्यांच्या वाटणीचा डब्यात भरला होता कारण नातवाचा बाळ हट्ट पूर्ण करायचा होता. आम्ही घरी पोहोचल्यावर आईने डब्बा उघडून बघितला. दादांना माझ्यासाठी काय करावे लागले यासाठी आई आणि आजोबा एकमेकांच्या कडे बघून स्मित हास्य करत होते. म्हणजे माझी नजर चुकवून. मग काय चल गरम करून दे प्लेट मध्ये शिरा. 

अजूनही मी त्या प्रसादाच्या शिऱ्याच्या प्रेमात आहे. नाही म्हणजे सर्वांना माझे एकच म्हणणे असते की करत जा सत्यनारायण. नवीन घर झाले की, लग्न झाले की, गणपती मध्ये, किंवा अन्य आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली की आणि बाकी सर्रास जेवण देण्यापेक्षा अगदी प्लेट भरून प्रसाद सर्वाना देत चला. अगदी दिल खुष पणे. आणि कोणाला नसेल देणार तर निदान मला हळूच द्या. मी कोणाला नाही सांगणार.

दादांच्या सोबतची ती गणपती मधील रात्र मलाच कधीतरी हसवून जाते. आणि मला बालपणात घेऊन जाते.

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...