Sunday, 20 August 2023

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

डॉ. अलोक पवार

भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवेळी भारतीय बाजारपेठ अधिकाधिक प्रबळ कशी होईल याचा विचार केला गेला. ब्रिटिश भारतात त्याच बाजारपेठेचा भाग म्हणून इथे आले आणि भारतावर राज्य केल. त्या ब्रिटिशांना इथून हाकलायचे आणि मग विविध क्रांती घडवून आणायची, हा येथील सर्वांचाच विषय होता. भारत स्वातंत्र झाला. भारत जसा स्वातंत्र झाला तसे भारतामध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, औद्योगिक क्रांती निर्माण झाली. या सर्व क्रांती भारताच्या विकासासाठी अगदी महत्वाच्या ठरल्या. याचं क्रांती च्या यादीमध्ये एक महत्वाची क्रांती आपले स्थान निर्माण करते ते म्हणजे तंत्रज्ञान क्रांती. भारताचे नववे पंतप्रधान राजीव गांधी त्या तंत्रक्रांतीचे प्रणेते म्हणायला हरकत नाही.

एखाद्या लहान मुलाला गाड्या खेळणे, त्यांना खोलण्याचा छंद असतो ना तसाच राजीवजी गांधी यांना यांत्रिक उपकरणे खोलणे आणि पुन्हा जोडणे असा छंद होता. त्यांचा हाच छंद त्या यंत्रा विषयीची उत्कंठा दाखवून देत. इलेक्ट्रॉनिक विषयातच त्यांची रुची अधिक होती. १९७४ साली त्यांनी बाजारातून विविध यंत्रे आणून घरच्या घरी एक रेडिओ निर्माण केला होता. खर तर नेहरू आणि इंदिरा गांधी घराण्यातील तिसरी पिढी असल्याने घरात निवांत बसायचे किंवा राजकारणात सक्रिय राहायचे असा कोणताच गुणधर्म राजीवजी यांच्यात नव्हता त्यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे मन या इलेक्ट्रॉनिक्स च्या विश्वात रमायचे.

राजीव गांधी जेंव्हा व्यवसायिक वैमाणिक म्हणून काम करायचे तेंव्हा ते कधी कधी संपूर्ण दिवस मुंबईमध्ये थांबायचे. याचं दरम्यान त्यांची ओळख प्रभाकर देवधर यांच्याशी झाली. तेंव्हा देवधर यांच्याकडे असलेला बीबीसी स्पेक्ट्रम हा कॉम्प्युटर बघायला भेटला. देवधर यांनी पुढे एपलॅब नावाची कंपनी देखील टाकली. तो कॉम्प्युटर आणि ती कंपनी या दोन्ही गोष्टींमुळे देवधर आणि राजीवजी यांच्यात चांगलीच गट्टी जमली. भारतामधील इलेक्ट्रॉनिक ची परिस्थिती कशी आहे, बाकीच्या देशांची कशी आहे, कोणता देश इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविण्यात आघाडीवर आहे हे त्यांना कळायला सुरवात झाली. कोरिया आणि तैवान सारखे देश या बाबतीत भरीव प्रगती करित होते. भारत मात्र स्वावलंबन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असल्याने त्या देशांतून इलक्ट्रॉनिक वस्तू भारतात विक्री साठी उपलब्ध नव्हत्या.  भारतातूनच भारताच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी निर्यात करण्यासाठी भर दिला जायचा. त्यासाठी मुंबई तील सांताक्रूझ येथे सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रोससिंग झोनची निर्मिती झाली होती. राजीवजी या सर्व गोष्टीमध्ये अधिक उत्सुकता दाखवायचे. मात्र बाहेरील विश्वात काय चालू आहे यात भारत निरुत्साही होता  भारतातील आयात धोरण व्यवस्थित नव्हते यातून राजीव जी अतिशय अस्वस्थ झाले होते.

१९८२ सालच्या एशियाड स्पर्धेची जवाबदारी इंदिरा गांधी यांनी राजीव यांना सोपावली.तेंव्हा त्यांनी दिल्लीच्या नॅशनल इन्फॉर्मेट्रिस सेंटर ला भेट दिली. अशी माहिती केंद्रे फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित नं राहता संपूर्ण भारत भर अशी केंद्रे स्थापन झाली पाहिजेत हा त्यांनी विचार मांडला. आशियाड स्पर्धेची सर्व माहिती कॉम्प्युटर द्वारा अद्ययावत करा अशीही सूचना त्यांनी केली. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर परदेशातून आयात करावे अशी इच्छा व्यक्त केल्यावर मात्र एन. आय. सी.च्या अधिकाऱ्यांनी हे आयात करण्यापेक्षा इथेच त्याची निर्मिती व्हावी असे फिक्स केले. एन.आय.सी. कडून त्याचे निर्माण झाले. यापुढे आयतवरील धोरणे बदलली. कर यंत्रणा सुधारली.काही मोठे कर रद्द देखील करण्यात आले. 

३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाची धुरा आपल्या हातात घ्यावी लागली. त्यांच्या या पंतप्रधान पदाच्या कालावधीत ते कॉम्प्युटर आणि दुरसंचार आणि एकूणच सर्व तंत्रज्ञान क्षेत्रात ते मोठी कामगिरी करतील याची सर्वच भारताला खात्री होती. त्यांच्या कालावधीत सॉफ्टवेअर क्षेत्राकडे सर्वजण उद्योग म्हणून बघू लागले. एकंदरीत भारतामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची आज जी झगमगाट दिसते आहे ती  सुरवात तेंव्हा झाली होती.१९८६ मध्ये राजीव गांधी यांनी पुन्हा एन. आय.सी. ला एका महत्वाच्या कामाला जंपले. गरीब जनता किंवा ग्रामीण जनतेला सरकार कडून जी मदत केली जाते किंवा जी कामे केली जातात त्याचा आढावा घेतला जातो त्याची माहिती मिळवता येईल का यासाठी कॉम्प्युटर चा वापर केला गेला. सर्वेक्षण करण्यात आले. खरे तर संख्यिकीय तथ्य म्हणजेच अनालायसिस त्या काळात केले गेले. त्या सर्व गोष्टींवरून राजीव गांधी यांना मिळवता कळाली की एक रुपयांची मदत ही लोकांपर्यंत पाठवली तर त्यातील १५ पैसेच त्यांच्या पर्यंत पोहोचतात. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचे संशोधन हे तंत्रज्ञानाने पुढे पोहोचले होते. कॉम्प्युटर चा मोठ्या प्रमाणात वापर रेल्वे आरक्षण आणि बँकिंग सेक्टर मध्ये देखील झाला पाहिजे ही पुढे त्यांची इच्छा होती. प्रत्यक्षात त्यांनी या गोष्टी करून देखील दाखवल्या. 

भारतातील सध्याचे जे प्रबळ आयटी सेल आहे किंवा जे अत्याधुनिक तंत्रज्ञान दिसून येते त्याची सुरवात ही राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत झाली. राजीव गांधी यांनी आपली आवड त्यांच्यापुर्ति मर्यादित नं ठेवता संपूर्ण भारताची गरज लक्षात घेऊन विकास साधला. भारतामध्ये संगणक शिक्षणाची सुरवात देखील त्यांच्या याचं प्रयत्नातून पुढे येताना दिसतात. 

राजीव गांधींच्या याचं व्हिजन मुळे आजही ते लक्षात राहतात. राजीवजींच्या जयंतीला त्यांना सादर प्रणाम...

Thursday, 13 April 2023

आकाश निळं बाबासाहेबांमुळं

 आकाश निळं बाबासाहेबांमुळं 

डॉ. अलोक पवार

सध्या पुण्यात, पुण्यात काय महाराष्ट्रात, भारतात भीम गर्जना होते आहे. का तर काही लोक म्हणतात, "आमच्या बापाची जयंती येते आहे". अहो बापच म्हणायचा कारण आई आणि वडिलांच्या जनुकांच्या जीवावर पोर जन्म घेत, आई - वडील लेकराला वाढवतात, त्याला खाऊ पिऊ घालून मोठ करतात, शिकवतात, त्याला समाजात वावरण्यासाठी काबील बनवतात. हे लेकरासाठी कोण करत आई आणि बाप. बाप बाहेर कष्ट करतो लेकरासाठी ढोर मेहनेत घेतो. मग हा वेगळा बाप.. त्याची जयंती एवढी जंगी...अहो दादा हा आमच्या बापाचा पण बाप आहे, आमच्या आज्याचा पण बाप आहे. आमच्या सर्वांचा बाप आहे. आणि त्याने आमच्यासाठी करूनच ठेवलं आहे सर्व जे आमच्या कित्येक पिढ्यांसाठी खाण्याची सोय असेल, शिक्षणाची सोय असेल, नोकरी धंद्याची सोय असेल आणि समाजात वावरण्याची सोय असेल सगळी सेटिंग करून ठेवली आहे. ती सेटिंग इतकी मोठी आहे की आमचे बांधव जेंव्हा भीम गर्जना देतात न, "आकाश निळं आमच्या बाबासाहेबांमुळं..." म्हणजे एवढं मोठ पसरलेलं आकाश, ते आणि या बाबासाहेब आणि आकाशातला निळा रंग जो रंग बाबासाहेबांच्या ध्वजाला पण आहे या सर्वांचा नक्की संबंध काय आहे ते जाणून घेण्यासाठीचा हा लेख. 



एका ताईंची हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी चालू होती. हॉस्पिटल हे कॉलेजशी संबंधित असल्याने डॉक्टरांच्या टीम सोबत शिकवू विद्यार्थी सुद्धा ऑपरेशन थिएटर मध्ये होते. ताईंना मुलगी झाली. सिजेरियन प्रक्रिया पार पडली होती. मुलीचा आकार अगदी बारीक असल्याने तिला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. सिजर झाल्याने त्या ताई बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोन तासांनी जस जसे इंजेक्शन चा असर कमी होत होता ताईंना अतिशय वेदना होत होत्या. ताई अगदी जोर जोरात ओरडू लागल्या. डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी पाहिले, तपासले तेंव्हा त्यांना कळले ताईंच्या पोटात अजूनही बाळ वाढवण्यासाठी जे गर्भजलं लागते त्याचा बराच भाग अजूनही पोटात आहे. ते जर बाहेर आले नाही तर त्याचे विष होईल आणि ताई त्वरित जाऊ देखील शकतील. ताई वाचल्या. ताईंच्या पोटातील काही भाग आता ताईंचा राहिला नव्हता. तो काढला आणि ते विष संपलं.

नीट समजून घ्या या गोष्टीचा संदर्भ आणि बाबासाहेबांच्या पर्यंतच्या लोकांनी नक्की काय पाहिलं होत. नेहमी सांगितलं जात, आधीच्या काळात मनुस्मृतीच्या धर्तीवर चार वर्ण होते, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सर्वांसाठी सगळं वेगवेगळ. ब्राम्हण म्हणजे शिक्षणाचे भांडार. या भांडाराचे लाभ घेणारे ब्राम्हण आणि क्षत्रिय पुरुष. स्त्रिया नाही. फक्त ब्राम्हण व राजेशाही घराण्यातील क्षत्रिय पुरुष. ब्राम्हण स्त्रिया व क्षत्रिय स्त्रिया या म्हणजे घरंदाज स्त्रिया, डोक्यावर पदर, हातात चुल आणि पदरी मूल. वैश्य यांच्याकडे व्यापार व ब्राम्हण, तसेच क्षत्रियांच्या बऱ्याच कामांची जवाबदारी असायची. शेवटचा वर्ण म्हणजेच शूद्र. छे म्हणजे यांनी जन्मच का घ्यावा? आणि तुम्ही घेतला आहे जन्म तर तुमचा हा जो तुमच्या नाकाद्वारे श्वास चालू आहे तो पण आमच्यामुळे. अशी काहींची धारणा होती. तुम्ही चालताय जमिनीवर आणि तुम्ही जेथून जाताल तेथे तुमची पावलं उमटतील आणि त्या पावलांवरून आम्ही चालायचं, म्हणजे तुमच्या पावलांनी अपवित्र झालेली जमीन त्यावरून आम्ही चाललो म्हणजे आमचा धर्म बुडाला. या पवित्र्याने तुम्ही पायात जोडे घालायचे नाहीतच शिवाय बुडाला नेहमी मागच्या बाजूने झाडू लावून ठेवायचं. अहो माकडाचा जेंव्हा माणूस झाला तेंव्हा त्याची शेपटी झडली हो. पण या दडपशाहीने एक नवीन शेपटी या बांधवांच्या मागे आली होती. त्या ताईला पोर जन्मल्यावर नको असलेलं गर्भजलं पोटात असल्यावर च्या तीन तासासाठी मरण यातना झाल्या त्याच मरण यातना या बांधवांना कायम आपल्या बुडाला तो झाडू लावून पुढे जाताना होत होत्या. वर बघायची खोटी. सर्व खालच्या दर्जाची कामे या समाजाला. म्हणजे हाताने माणसाचे मलमूत्र असलेले गटार साफ करा, लाकडे तोडा, फोडा, एखादा घरचा प्राणी मेला की त्याची विल्हेवाट लावा, त्याची कातडी काढा.... ही फक्त आणि फक्त खालच्या दर्जाची कामे. ही कामे करताना फक्त खाली आणि खालीच बघायचे. मग त्यांनी कधी वर बघितलेच नाही हो. त्यांनी बघितली ती काळी माती, त्यांनी बघितली ती मेल्या जनावरांची कातडी, त्यांनी बघितले ते गटारातून वाहणारे काळे पाणी. तुम्ही त्यांना कधी वर बघूच दिले नाही. मग वर आकाश असते, त्यात सूर्य असतो, चंद्र असतो, तारे ग्रह हे त्यांनी कधी बघितलंच नाही हो. का तर ही माणसे विष अगदी उराशी घेऊन फक्त जगत होते. बाबासाहेबांनी हे सर्व पाहिलं, अनुभवलं. आणि जणू हे सर्व बदलण्याचा ध्यासच घेतला. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "अन्याय करण्याऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो". हे त्यांचे वाक्यच मोठी ठिणगी पेटवणारे होते. अजून किती दिवस अन्याय सहन करणार. त्यांना मोठा बदल अपेक्षित होता. हा बदल एक दिवसात घडणारा नव्हता. 

हा बदल कोणासाठी होता? मला असे वाटते खरे हा प्रश्न आणि त्याचे उत्तर हे नीट समजून घेतले पाहिजे. काही लोक म्हणतील अरे काय केल आंबेडकरांनी आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी. त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठी शूद्र किंवा schedule Caste साठी केलंय. हो त्यांच्यासाठी तर केलच म्हणून तर ते बापाची जयंती साजरी करणार आहेत. मात्र तो सर्वांचाच बाप म्हणावा लागणार आहे कारण बापच असा माणूस असतो जो त्याचा लेकरांसाठी प्रॉपर्टी ठेवून जातो. म्हणून तो बाप समजून घ्यावा लागतो. आपण शिकतो, आणि शिकून बड्या पगाराची नोकरी करतो. ही नोकरी ढोर मेहनतीने नाही करत. बारा बारा तासांची नोकरी आता आपण नाही करत. कार्यालयांच्या वेळा नियमाप्रमाणे फक्त ८ तास असाव्यात, त्यावर कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये, हे झाले आपल्या बाबासाहेबांमुळे. नाहीतर अजूनही आपण बारा तास राबलो असतो. आणि हो हे फक्त एका ठराविक जातीतल्या लोकांसाठी नाही तर सकळ भारत वासियांसाठी होते. आधीच्या काळी वेतन देण्याची सुविधा ही देखील आठवडी होती. इंग्रजांच्या काळात ही आठवडी सुविधा मासिक वेतनाची झाली. मासिक पगार मिळायला लागल्यापासून तब्बल ४ आठवडे म्हणजे एका महिन्याचा पगार कमी भेटतो आहे हे अभ्यासाने दाखवून दिल्यावर एका आठवड्याचा पगार बोनस म्हणून द्यावा आणि तो बोनस दिवाळी सारख्या सणाला दिला जावा हे देखील बाबासाहेबांनी म्हणलं. म्हणजे आपल्या ज्या कामावरच्या वेलफेअर स्किम्स आहेत ना त्या बाबासाहेबांनी घट्ट रुजवल्यात. बर हे फक्त एका जातीपुरत्या मर्यादित नाही केल तर सर्वांसाठी केल.

बाबासाहेबांना समानता पाहिजे होती. या राज्यात कोणी दुजा होता कामा नये त्यांचे म्हणणे होते. त्यांचे असे म्हणणे होते की जर, "असा धर्म मानतात जो समानता, स्वतंत्रता आणि बंधुता शिकवतो". त्यामुळे आज आपण जेंव्हा हक्काची लढाई लढतो, ती ज्या कायद्यावर चालते मुळात आपण आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे त्या कायद्यांचा रचेता जो आहे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मग जेंव्हा एखादा व्यक्ती कोर्टात दाद मागायला जातो मग तो कोणत्या जातीचा असो त्याला न्याय मिळत असेल तर त्याने लक्षात घ्यावे, ही न्यायव्यवस्था भरभक्कम आपल्या बाबासाहेबांनी केली आहे. चुकीचा न्याय भेटला असता तर आपणही जेल मध्ये गेली असतो, ती काळी अंधारी खोली बघितली असती. आणि खुल निळ आकाश बघायला मुकलो असतो.

बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे फक्त मागासवर्गीय व्यक्तीच नाही तर सर्वांनाच या निळ्या आकाशाच्या छताखाली समानतेने राहायची संधी प्राप्त झाली आहे. आंबेडकरांनी जेंव्हा राजकारणात यायचा विचार केला समता दलाच्या माध्यमातून त्यांनी सुरवात केली व पुढे रिपब्लिबकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली त्यामध्ये जो झेंडा वापरला गेला त्यातही निळ्या रंगाच्या झेंड्याचा वापर झाला तो झेंडा देखील तुम्ही आम्ही एक समान आहोत या प्रतिकाने ते दर्शविले गेले. 

त्यामुळे आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे आपल्याला जे फक्त खाली बघून फक्त निस्तेज जमीन ज्यावर आपल्याला फक्त घाणीचे सामाज्य पसरले आहे, जिथे फक्त गटार गंगा वाहत आहेत, जिथे काळ्या कोठड्या आहेत, जिथे फक्त मृतदेह पडले आहेत, जिथे उत्तम अशी न्यायव्यवस्था नाही त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात पाहिले ताठ मानेने जगायला शिकवले. चुकी नसताना खाली बघणाऱ्यांना एक आत्मविश्वास दिला आणि त्यातूनच आपल्याला या निळ्या आकाशाची प्राप्ती करून दिल्यामुळेच आज हा रंग आपण बघितला. म्हणूनच मी म्हणतो आकाश निळं बाबासाहेबामुळं....


Saturday, 8 October 2022

होता जिवा म्हणून वाचला शिवा

 होता जिवा म्हणून वाचला शिवा

आपण सर्वांनी "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण ऐकली असेलच. मराठी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज फुलवले, मोठे केले वाढवले असे आपण ऐकतो. वेळी मावळ्यांमध्ये सर्वच मावळे महाराजांना एकनिष्ठ होते. त्यामधलाच एक मावळा म्हणजे जिवाजी महाले. प्रतापगड्याच्या पायाथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट निश्चित झाली. भेटी दरम्यान खानाने जी गद्दारी केली त्याला अद्दल घडावी म्हणून महाराज सुरवातीपासून जी तयारी करून आले होते, त्यातून त्यांनी खानाचा अगदी वाघ नख्यांनी कोथला बाहेर काढला होता.



आपल्या मालकाला मारल्यावर संयद बंडा शिवाजी महाराजांवर धावून गेला होता. महाराजांवर त्याची तलवार वार करणार इतक्यात जिवा महाला हा अवघ्या पंचवीस वर्षांचा मावळा आपला दांडपट्टा टाकतो. जिवा महाले दांडपट्टा चालविण्यात एकदम तरबेज होता.  त्याने आपल्या दांडपट्टाने संयद बंडा ला आडवे केले होते. 

संयद बंडा हे त्यावेळी महाराजांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. संयद बंडाला मारून त्यांनी जी बाजी मारली होती त्यातून महाराजांचा जीव वाचला होता. 

जिवा महाला हे न्हावी समाजातील. त्यांच्या वडिलांनी शिवाजी महाराज यांच्या वडिलांकडे सेवा दिली. युद्धात स्वतःचा पाय देखील गमावला. जिवा महाला यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी स्वराज्याची भगवी ज्योत अखंड ठेवली. आणि म्हणूनच म्हणतात ' होता जिवा म्हणून वाचला शिवा'

आज त्या जिवाजी महाले यांची जयंती. त्यांना त्रिवार अभिवादन.


Thursday, 28 July 2022

परीक्षा आणि कॉपी

 परीक्षा आणि कॉपी 

अलोक पवार 

विद्यार्थ्यांनो नक्की वाचा... थोडा वेळ गेला तरीही चालेल. 

परीक्षेत कॉपी करणे ही अगदीच नवीन कला नाही. अतिशय जुने आणि पूर्वीपासून चालत आलेली एक रूढी आहे. जुन्या काळी वेगळ्या पद्धतीने कॉपी केली जायची. आणि साधारण तीच पद्धत प्रचलित असायची. आता मात्र काळानुसार या कॉपी करण्याच्या प्रकारात बदल झाला गेलाय. 

माझ्याकडे परीक्षेला वरिष्ठ पर्यवेक्षकाची जवाबदारी देण्यात आली. परीक्षा ही कोणत्याही प्रकारे व्यवस्थित शांततेने आणि कॉपीमुक्त झाली पाहिजे ही या वरिष्ठ पर्यवेक्षक पदाची जवाबदारी असते. एका वर्गात अनेक प्रकारचे विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामध्ये वर्षभर भरपूर अभ्यास करणारे देखील विद्यार्थी असतात. जे त्यांना अगदी थोडस देखील समजल नाही तर शिक्षकांना विचारून शंकेच समाधान करतात. अगदी मुळापासून अभ्यास करतात. मात्र त्याच वर्गात काही असे विद्यार्थी असतात जे वर्गात कमी आणि बाहेरच्या दुनियेत अतिशय रममाण असतात. त्यांना वर्गात बसूच वाटत नसते. शिक्षकांच्या सूचना त्यांना नकोशा होतात.आता या सूचना का नकोशा होतात यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. 

आपला पाल्य कमावता झाला पाहिजे, आणि ही गोष्ट अगदीच लवकर झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. मग काय आजकाल मी महिन्याच्या सुट्टीमध्ये एखादा छंद जोपासायाच्या ऐवजी पाल्याला तू कुठेतरी कामाला जा असे सांगितले जाते. एक महिना तो विद्यार्थी विद्यार्थी दशेतून बाहेर पासून सुजाण नागरीकतेच्या भावनेत पोहोचला जातो. त्याच्या मनात आपण कमावते झालो आहे आणि आता शिक्षणाची काय गरज. त्याला असेही वाटते की आत्तापर्यंत मी जे शिकलो आहे ते तर काही या कामामध्ये उपयोगाचेच नाही. पण त्याच कामामध्ये जर सांगितले गेले की बाबांनो प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे. आई - वडिलांनी मुलगा स्वतःचा खर्च स्वत: उचलतो आहे या उद्देशाने त्याच्यासाठीची तरतूद बंद केलेली असते. आणि त्यांना अगदी या गोष्टीचा अभिमान देखील वाटू लागतो की आपला मुलगा - आपली मुलगी कमावती झाली. तिचा खर्च ती स्वत: उचलते आहे. त्यामुळे तिचे शिक्षण काय चालू आहे कुठे चालू आहे कसे चालू आहे, या गोष्टींकडे त्यांचे लक्ष अगदी कमी असते. 

कोरोना नंतर ही जी परिस्थिती अगदीच बिकट झाली. बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे मुलांनी घरातील निर्वाह चालविण्यासाठी हातभार लावणे   

Wednesday, 11 May 2022

माझं आकाश

 माझं आकाश

मला एक फोन आला, "सर अहमदनगर वरून बोलतोय, बीसीए ला ऍडमिशन घ्यायचे आहे, फी किती आहे, सांगा ना". "त्यासाठी कॉलेज ला यावे लागेल मी इकडे आलास की तुला सर्व माहिती दिली", मी फोन वरून लगेच उत्तर दिले. "सर येतो उद्या". मला फोनवरून उगाच मला माहिती विचारून त्रास देतोय असच वाटलं. आणि मी इकडेच ये, आता काय फोनवरूनच ऍडमिशन घेणार का असे बोलून फोन ठेवला. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार च्या सुमारास एक सडपातळ बांध्याचा एक मुलगा खरंच आला. आणि मला माहिती विचारू लागला. बीसीए चांगलं ना, काय काय असत त्यात, फी कमी नाही का होणार, तीन वर्ष एवढीच फी ना, अजून काही सोई आहेत का, हॉस्टेल आहे का, शिक्षक कसे आहेत, .... अरे किती प्रश्नच संपत नव्हते. मला मनात वाटले होते हा नगर चा मुलगा अजिबात इथे प्रवेश घेणार नाही. उगाच इथे चौकश्या करायला आलाय. 

तिसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चिती केली, आकाश कोल्हे, मूळचा बीड जिह्यातला. पण बारावीचे शिक्षण नगर च्या आत्याकडे झाल्याने तो नगर चा असे म्हणत होता आणि आता पुढच आयुष्य पुणेकर बनण्यासाठी इकडे आला होता. मी कॉलेज च्या पहिल्या दिवशी कमवा आणि शिका योजनेबद्दल् माहिती सांगितली होती, त्या दिवशी लगेच तो माझ्याकडे आला आणि सर मी घेऊ शकतो का हो भाग असे तो म्हणाला. हो नक्कीच, का नाही उत्पन्नाचा दाखला आणून दे आणि घे भाग. 

त्याच वर्गाचा मी वर्गशिक्षक देखील होतो. तो नेहमी माझ्या तासाला उशिरा यायचा. मी नेहमी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठा बश्या काढायला लावायचो, तो नेहमी काढायचा. आमच्या कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेच पन्नास विद्यार्थ्यांचे युनिट मान्य झाल. त्याच वर्षी केरळ ला पूर आला होता. मी याचं युनिट ला घेऊन पैसे गोळा करण्याचं काम करत होतो. तेंव्हा सर्वात मागे आळशी राहणारा विद्यार्थी म्हणजे हा आकाश. डोकेफोड किती करायची म्हणून मी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करायचो. डिसेंबर महिन्यात आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर जायचे ठरले. पंचवीस मुलांना घेऊन मी देखील या कॅम्प मध्ये सहभागी झालो होतो. खूप मज्जा केली कॅम्प मध्ये मी सर्व विद्यार्थी काम करत असताना मागे राहायचो. या आकाशला माझ्याबरोबर राहण्याची काय सवय लागली होती काय माहिती. म्हणजे मला फोटो काढण्याचं प्रचंड वेड. म्हणजे मी स्वतःचे फोटो काढायचो, माझ्या फोटोत त्याला देखील घुसायचे असायचे. मला नाही म्हणता आले नाही. कॅम्प वरून आल्यावर् काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या सर तुमच्यामागे असल्याने तुम्हाला दिसायचं नाही पण त्याने काहीच काम नाही केले, नुसता मोबाईल फोन वर असायचा तो.

माझी चुकी मी दुरुस्ती करण्याचे ठरवले. आणि कमवा व शिका योजनेत सहभागी असूनही अजून रोज उशिरा येणाऱ्या आकाश ला पुन्हा उशिरा येण्याचे कारण विचारले. उत्तर काहीच नाही आले. दुसऱ्या दिवशी मलाच उशीर झाला. मी कॉलेज मध्ये पायीचं जातो. मला रस्त्यावर एक दुकानाच्या पायरीवर आकाश ओरिओ चा बिस्कीट पुडा खाताना दिसला. "सर खाणार का?", म्हणजे मी ओरडणार तर हे असे खाणार का विचारले तर कसे ओरडणार. म्हणून, "चल उठ घरून नाश्ता करून येता येत नाही का, इथं बसून हे असल खात बसतो". सर माझे आई वडील नगर ला ना... ( हे तो चक्क खोट बोलला होता) मग नाश्ता का नाही करत तर् सर एवढ्या सकाळी दहाच्या आत कुठे दुकान उघडत नाही. 

मला हे उत्तर एकून् अगदी कासावीस झाल्यासारखे वाटले. मी त्याला रोज उशिरा येण्याबद्दल ओरडायचो, उठाबाशी काढायला लावायचो  माझा मला राग आला. मी पुढच्या रविवारी माझ्या घरापासून अगदी सकाळी चालत त्याच्या घराकडे पर्वती पर्यंत बघत बघत गेलो, खरंच एकही दुकान नाश्ता किंवा खाऊ साठी उघडे नव्हते. मग मी त्याला घेऊन अगदी सारस बागेच्या तिकडेही बघितले. साडे आठ पर्यंत पण दुकाने बंद होती. मी निरुत्तर झालो होतो. आमच्याच कॉलेज मधल्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडे याने मेस लावली होती. पण तरीही तुझा नाश्त्याच काय, संध्याकाळच्या चहाच काय असे मीच त्याला प्रश्न करायचो. मला संध्याकाळी चार् च्या सुमारास दूध प्यायला यायचे. मी आकाश ला आधी ओरडलेलो म्हणून त्याला चला अर्धा दुधाचा कप संपवा, असा आदेश मी त्याला दिला. दूध आवडत नाही, दूध नको पण माझा अट्टहास त्याच्यापुढे त्याचे काय चालणार म्हणून पिला त्याने अर्धा कप. या दुधाने काय होणार म्हणून मी भरपूर ओरिओ आणि क्रीमची बिस्कीट आणली होती. आता काय माझा ओरडा खाण्यापेक्षा दूध बिस्कीट खाणे परवडायचे. बर हे आमचं सिक्रेट होते बर म्हणजे तो माझ्या दुधातला वाटेकरु होता हे कोणालाच माहिती नव्हते. 

थोडया दिवसांनी माझं पीएचडी काम मी सुरु केले. मला माहिती गोळा करण्यासाठी बाहेर जावे लागायचे. मी आकाश ला माझ्या सोबत घेऊन जायचो. त्याची मिनी पिकनिक पण व्हायची मला पण मदत व्हायची. त्याच कामासाठी मी महाविद्यालयात जास्त वेळ बसायचो. एक दिवस आकाशने मला विचारले सर मी पण कॉलेज मध्ये बसू का अभ्यासाला. तुम्ही बसता तेवढ्या वेळ. माझ्या केबिन ची सोडून बाकी जवाबदारी मला टाळायची असल्याने मी त्याला बस माझ्याच केबिनमध्ये असे बोललो. कधी माझ्या केबिनचा सोफा त्याची अभ्यासाची जागा झाली कळलेच नाही. अगदीच मला त्रास होऊ नये म्हणून मांजरीच्या चोरपावलाने यायचा आणि अभ्यासाला बसायचा. परीक्षा आली की बाहेर फेऱ्या मारत वाचन करायचा, मला म्हणायचा माझी पद्धती आहे अशीच. मला त्याचे हे अभ्यास करणे प्रकरण खूप मनापासून आवडायचे. आपण त्याला पुढे नेऊ शकतो का आपण त्यावर आणखीन कष्ट कसे घेऊ शकतो हे माझ्या डोक्यात सतत चालू लागले. तो त्याच्या स्वभावाने मला स्वतःकडे आकर्षित करून घेत होता नकळत. 

एकदा मला त्याचा पुढचा एक दात किडलेला असा वाटला. मी त्याला म्हणालो काय हे दात किडायचे काय वय आहे का हे, चल डॉक्टर कडे जाऊ आणि मी त्याला खरेच घेऊन गेलो, डॉक्टरने चार सेशन मध्ये रूट कनेल करायला सांगितले. मी त्याला काही न विचारता सुरु करा असे सांगितले. उगाच चालू आहे हे सगळं असे त्याला वाटायचे. कारण त्याला तसा त्रास नव्हता पण मी किडलेला दात समोर म्हणून भविष्यात काही त्रास नको असे म्हणून याची सुरवात केली. मग त्याला प्रत्येक सेशन नंतर आईसस्क्रीम खाऊ घालण्याची जवाबदारी पण माझी होती. सेशन चालू असताना आ ऊ करायचा पण सेशन झाल्यावर फरक बघितल्यावर त्याला अगदी जीवात जीव आला. मी त्याला त्या नंतर नेहमी म्हणायचो तो दात माझा आहे बरका सांभाळून ठेव.

आता इथून पुढे त्याच जे राष्ट्रीय सेवा योजनेमधील मागे पडलेले कर्तृत्व आहे ते देखील थोडे वर आणायचे होते. विद्यार्थ्यांच्या मनात तो जे आळशी होता ती प्रतिमा चांगली करायची होती. यावेळी मी त्याला अगदी बसवून राष्ट्रीय सेवा योजनेच गणित सांगितले होते. देशाच्या फायद्यासोबत तु देखील उत्कृष्ट स्वयंसेवक बनू शकतोस फक्त प्रत्येक योजनेत् सहभागी हो. उत्तर लगेच "हो" आले पण मला एवढे हो बोलून ऐकायचे नव्हते मला प्रॉमिस पाहिजे होते तेही लेखी. म्हणून मी सर्व करून दाखवेल हे लेखी प्रॉमिस घेऊन त्याची त्यावर सही घेतली होती. तो प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत होता. एक नवीन परिपत्रक आले की सव्वीस जानेवारीच्या राष्ट्रीय परेड साठी विद्यार्थी निवडीसाठी. रोज फिजिकलं फिटनेस ची बाळासाहेबांना अजिबात प्रॅक्टिस नव्हती. पण मी जाणार असे त्याने फिक्स केले.

मी आकाशसोबत कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे त्यात खंड नसावा म्हणून पुण्यातल्या त्याच्या रूममेट सर्वांचा नंबर घेतला मला अगदी दोन दिवस आधी त्याच्या एका रूम मेट चा फोन आला. सर आकाश ची तब्बेत खराब झाली आहे. उलटी आणि चक्कर आल्यासारखे वाटते आहे त्याला. मी तो पुढे काही बोलेल याच्या आतच येतो मी तिकडे. नेमका रविवार होता. सर्व दवाखाने बंद होते. आकाश ला खूप जास्त ताप आला होता, अंगात त्राण नसल्यासारखे झाले होते. माझी एक डॉक्टर मैत्रीण माझ्या घराजवळ राहत होती. मी त्याला तिच्याकडे त्याला घेऊन गेलो. त्याला एक इंजेक्शन आणि सलाईन तीने तिच्या घरीच लावले. त्याची अवस्था बघता मी मनात उद्याचे कदाचित सिलेक्शन आता हातातून गेले. त्याच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवून ताप जातोय का हे मी बघत होतो. गोळ्यांचा पण असर होत होता. रात्र गेली दुसऱ्या दिवशी आकाश मला स्वतःहून उठून म्हणाला सर जायचे ना? डोळे खोल गेले होते. ताप नव्हता पण काल सलाईन आणि इंजेक्शन घेतलेला आकाश मला म्हणत होता चला नाहीतर दुसऱ्याची निवड होईल. कसलीही प्रॅक्टिस नाही, एक दिवस आधी असे आजारपण पण मनातून उत्साह असल्यामुळे मी हो म्हणालो. अगदी लहान बाळाला तयार करतात तसे मी त्याला चल शंबो करा, त्याला नाश्ता देऊन डोक्यावर टोपी घालून रेडी केल. आणि टू व्हीलर वर घेऊन गेलो. आकाश तिथले सर्व टास्क करत होता पण कालचे आजारपणाचं शरीर साथ नव्हतं देत. माझ्या दृष्टिकोनातून तो सहभाग पुरेसा होता. निवड नाही झाली. मी त्याला समजावून सांगितलं जाऊ दे पुढे भविष्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री तुला स्वतःहून बोलावून घेतील.

आकाशच आजारपण पाहून तो थोडासा नाजूक वाटला, पण तो अजिबात तसा नव्हता. म्हणजे गावाची हवा आणि पोष्टिक अन्न हे त्याच्या नसानसातून वाहत होत. पण त्या क्षणापासून त्याची काळजी अधिकाधिक वाटत होती. मग त्याला माझा पीएचडी आणि त्याचा अभ्यास झाल्यावर घरी जाण्यासाठी बस साठी सोडवायला जाणे, त्याची बस येईपर्यंत तिथे थांबणे हे मी स्वत नियमित करायचो.  

आकाश जसा माझ्याकडे यायचा तस माझ्याकडून् त्याने हे केल पाहिजे ते केल पाहिजे या अपेक्षा प्रचंड वाढू लागल्या होत्या. मी त्याच्यासोबत ई कॉमर्स शिकवत असताना त्याला घेऊन एक रिसर्च पेपर लिहिला. आणि एक महाविद्यालयात जाऊन तो प्रकाशित पण केला. तो त्याच नाव त्या प्रकाशनावर पाहून भलताच खुश झाला होता. मग त्याने स्वतने सर आपण अजून लिहुयात का असे संशोधन पेपर हे मला विचारले. मग काय आपण तीन वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लिहुयात हे करता करता आम्ही जेजुरी, अहमदनगर, रत्नागिरी, कोल्हापूर सगळीकडे पेपर्स लिहिले. आकाशचे फक्त महाविद्यालयातील दीड वर्ष पूर्ण झाले होते. पण चांगल्या दर्जाचे पेपर लिहून झाले होते. त्याच्या गावाला म्हणजे बीड ला कॉन्फरन्स असेल तर आम्ही आवर्जून जायचो. आम्ही दोनदा बीड ला गेल होतो. नोंदणी करणाऱ्या शिक्षिका गावातील असल्याने त्यांनी आकाश ला ओळखले मग त्याने माझी ओळख करून देखील दिली. आकाशला त्यांनी सांगितले, आकाश सरांना अजिबात सोडू नकोस, असे मार्गदर्शक नेहमी भेटत नाहीत. ती एक युजीसी तर्फे आयोजित कॉन्फरन्स होती आणि मी व आकाश ने नॅक मधील मेंटोर - मेन्टी ही संकल्पना यावर संशोधन पेपर लिहिला होता. आम्ही जाणून बुझून एकसारखा शर्ट आणि पँटदेखील घातले होते. मला तेथील सर्व शिक्षक विद्यार्थी समजत होते. पण ओळख करून दिल्यावर त्या सर्वांना आमचा रिसर्च पेपर देखील आवडला. माझ्या पेपर ला तर ट्रॉफी सुद्धा दिली. आकाश पक्का खुश झाला होता. आम्ही जेजुरी ला गेल्यावर खंडोबाचे, कोल्हापूर ला गेल्यावर महालक्ष्मीचे, नगर गेल्यावर शिर्डीच्या साईबाबांचे तर बीड ला गेल्यावर रामाचे दर्शन घेतले. सोबत आकाश होता.मी त्याच्या उत्कृष्ठ गुणांसाठी मागणी करायचो सर्व देवांकडे. जेजुरीला तर मागणी थेट पूर्ण झाली होती. आकाश चा तिसऱ्या सेम चा निकाल तिथे कॉन्फरन्स मध्येच लागला. त्याला बरेच भारी गुण मिळाले होते. ज्या विषयात सर्वांना मार्क कमी पडतात त्यामध्ये त्याला शंभर पैकी शंभर गुण पडले होते. मला राहवले न गेल्यामुळे मी लगेच जेजुरीच्या महाविद्यालयातील प्राचार्या मॅडम ला सांगितले, त्यांनी लगेच त्याचा सत्कार केला. हा त्याच्या सत्काराबरोबर माझा देखील आंतरिक सत्कार होता. 

तो द्वितीय वर्षामध्ये असताना एक सरकार कडून जाहीर करण्यात आले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये तात्काळ बंद करा, आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवून द्या. आकाश माझ्यासाठी माझ्या नात्यापेक्षाही महत्वाचा वाटू लागला होता. त्याची मी अगदी मुलासारखी काळजी घेत असल्याने मी त्याला आवर आणि निघ म्हणालो. मग मी ऑनलाईन पद्धतीने शिकवायला सुरवात केली होती. 

मी त्याच्या भाड्याच्या घरून त्याचे कपडे त्याचे सामान, त्याच्या मित्रांशी अगदी भांडून माझ्या घरी आणून ठेवले होते. ऐन कोरोनामध्ये मी हे सगळे केले.  

एक महिना अगदी व्यवस्थित गेला. पण हा कोरोन जायचे नाव घेईना. मी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना आकाश कधीतरी गायब व्हायचा आणि मग त्याचा फोन गायब सर्व बंद. मी घरच्या सर्वांना फोन लावून बघितला तरीही कोणाचा फोन लागेना. एक दिवस गेला दोन दिवस गेले. आकाश तासाला अजिबातच बसत नव्हता. पाच सहा दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन लागला आणि ते म्हणाले की इथे सहा दिवस लाईट गेली आहे. डीपी खराब आहे. या अशा परिस्थिती मध्ये अभ्यास कसा होणार. जी पहिला येण्याची स्वप्न आकाश ने बघितली आहेत ती पूर्ण कशी होणार. त्याच्या स्वप्न बघण्याने ती स्वप्न माझी पण झाली होती. माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातले होते. माझ्याकडे बीड कॉन्फरन्स च्या वेळी तिथले आमदार भेटले होते, त्याचा नंबर होता. तिथली नायब तहसीलदार पण माझी विद्यार्थ्यांनी होती. मी लगेच दोघांना फोन लावला पण काहीच फायदा झाला नाही. जोपर्यंत स्मार्ट फोन चार्ज नव्हता होत तोपर्यंत आकाश लेक्चर ला बसणार नव्हता. मग माझ्याकडे गावातल्या अजून एक सरांचा नंबर होता. त्यांची शाळा त्यांच्या गावाच्या पुढच्या गावात होती. मी त्यांना विनंती केली, की आकाश ला शाळेत मोबाईल चार्ज करून तेथेच बसू दे का? शाळेला देखील सुट्ट्या होत्या, आणि त्यात माझे विचारणे म्हणजे तुमच्या मुलांना शाळेला सुट्टी न मग माझ्या मुलाला तिथे बसवा. मी अगदी हट्टाने सरांशी बोलत होतो. सरांनी आकाशवरचे माझे प्रेम, त्याचे नुकसान होऊ नये म्हणून माझी आस्था म्हणून लगेचच हो बोलले. पण पुढील काही दिवसात कोरोनाचे प्रमाण इतके वाढले की तो शाळा देखील संपूर्ण पणे बंद ठेवण्यात आलेली होती.   

पुन्हा काही दिवसांनी गावातील डीपी ला प्रोब्लेम झाला. यावेळी मी म्हणालो चला आकाशला त्याच्या घरून घेऊन येऊ. मला जाणे तितके सहज सोप्पे नव्हते. मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आणि सुप्रिया सुळे यांच्या सहाय्यक् यांच्या मदतीने डॉक्टर चे प्रमाणपत्र काढले आणि थेट गाव गाठले. आकाश ला घेऊनच यायचे हा चंग बांधला. यावेळी आकाश माझ्या घरीच राहणार. त्याची पदवी मिळेपर्यंत तो माझ्या घरीच राहणार हा मी निश्चय केला. और मेरा वाचन ही था मेरा शासन. आकाश ला माझ्या घरी अजिबातच रहायचे नव्हते. पण माझ्या पुढे चालतंय कोणाचं. तेंव्हा त्याची बिषाद.नाही नाही म्हणता रुळला. मग त्याला नाश्ता करून खाऊ घालणे, जेवण व्यवस्थित होते की नाही, त्याचा बेड आवरणे सर्व नैतिक जवाबदारी म्हणून मी करत होतो. मला चक्क एक बाळ सांभाळल्यासारखे.वाटत होते. आणि कधी आकाश माझा मनुडी, बाबुडी, मना झाला कळलं नाही. तोही मी मनु म्हणालो की ओ दयायाचा. त्याचा अभ्यास, त्याचा प्रोजेक्ट मी अगदी भन्नाट करून घेतला होता. कोणाची बिषाद एक तरी मार्क्स कमी करायची होईल. त्याला म्हणालो की सध्या कोरोना चालू आहे त्यावर आधारित प्रोजेक्त करू. एकदम भारी झाला होता प्रोजेक्ट. 

   

टॉयलेट : आमची लव्हस्टोरी

मी २०१९ मध्ये सर्वप्रथम आकाशच्या गावाला त्याच्या वाढदिवसाला गेलो होतो. घरी पोहोचल्यावर गावाला केक भेटत नसेलच म्हणून मी घरून केक बनविण्याचे साहित्य पण घेतले होते. माझ्या माऊ ला मस्त कपडे पण घेऊन गेलो होतो. गावाला केक बनविला आणि आकाशच्या आईला सांगितले की बोलवा आकाशच्या मित्रांना. आणि काही बायकांना त्याला ओवाळायला. संध्याकाळी बऱ्याच जणी आल्या. प्रत्येकीने आकाशला ओवाळले आणि आकाशला इतके गिफ्ट मिळाले, प्रत्येक बाईने आकाश ला पारले जी चा पुडा दिला होता. काही लहान मुलांनी पण त्याला तेच गिफ्ट दिले. मला लई भारी वाटले. 

या सर्व गोष्टींमध्ये मी हळूच इकडे तिकडे बघत होतो. म्हणजे टॉयलेट शोधण्याचा प्रयत्न करत होतो. खूप वेळ झाल्यावर मी काकूळतेने आकाश ला विचारले आकाश टॉयलेट कुठे आहे. आकाश ने मस्त उत्तर दिले सर मे महिना चालू आहे. शाळेचे टॉयलेट बंद असते. माझं डोक फिरत चाललं होत. अरे मग काय तुम्ही सर्व जण मे महिन्यात टॉयलेट ला जात नाही. सर समोर बघा आपली शेती आहे. जा तिकडे. मी तर यापूर्वी कोठे बाहेर बाथरूम् ला पण गेलो नव्हतो. हा मला चक्क टॉयलेट ला बाहेर जा म्हणतोय. तो उठला. त्याने बादली भरली आणि मला म्हणाला जा. जा म्हणताना तिथे त्याचा भाऊ, आज्जी, आई सगळे जण होते. मला खूप लाजल्यासारखे झाले होते. त्यामुळे तिथून जाणे भाग होते. तरी दबक्या आवाजाने मी त्याला विचारले आकाश गावातल्या तुझ्या एखाद्या मित्राकडे आहे का रे टॉयलेट. नाही ओ अख्या गावातच कोणाकडे टॉयलेट नाही. मी बादली उचलली आणि समोरून चालायला लागलो. तिथे समोर हपश्यावर काही बायका पाणी भरत होत्या. शाळेच्या कट्ट्यावर काही जेष्ठ मंडळी बसली होती. मला लाजल्याहून लाजल्यासारखे झाले होते. म्हणजे मी गावागावात जाऊन उघड्यावर शौच बंद करा म्हणणारा मास्तर आणि मी स्वतः आज उघड्यावर संडास ला जाणार होतो. मी जसा जसा पुढे जातोय तसे मला माझ्याकडे बघून काही जण स्मित हास्य देत होते. हातातली पाण्याची बादली मला लाजल्याहून लाजल्यासारखी करत होती. मी निर्लज्ज सारखे शेताकडे गेलो जरा लांब जाव आडोसा बघावा आणि बसावे असे म्हणून बसलो. थोडासा आवाज जरी झाला तरी मला विचित्र वाटत होते. मी आलो घरी. मला घरी आलो की आकाश ला खाऊ की गिळू असे झाले होते. मी घरी आल्यावर तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने हसून बघत होता. मी त्याला पुन्हा विचारले होती. कोणाकडेच टॉयलेट नाही. शेत असताना टॉयलेट कशाला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्या टॉयलेट चे रूपांतर घरातले गोडाऊन म्हणून केले होते. मला गावातल हे विदारक सत्य स्वीकारायचे होते. म्हणजे मला अजून काही दिवस त्या गावात काढायचे होते. मी नुकताच अक्षय कुमार चा टॉयलेट एक लव्हस्टोरी हा चित्रपट बघितला होता. म्हणजे महाराष्ट्र किती सुंदर जेथे मी राहतो आपल्याकडे सर्वत्र संडास आहेत. मोदींनी हर घर शौचालय अशी मोहीम काढली लोकांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. आणि महाराष्ट्रात तर असतीलच ही माझी समज साफ चुकीची निघाली. मी आकाश ला घेऊन गावात फेरफटका मारला. कोणाकडेच संडास नव्हती. हा गावात कुठे खराब पण दिसत नव्हते. आकाश त्यावर म्हणायचा प्रत्येक जण आपापल्या शेतात जातो. स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळी सोय असते. पण सर्वजण उघड्यावर. 

मला सर्व अवघड होते. मला ज्या विद्यार्थ्याला शिकवायचे होते, त्या विद्यार्थ्याला घेऊन मी बाजारातून एक संडासचे भांडे आणले. त्याने माझ्या होला फक्त हो करायचे होते. मी त्याच्या वडिलांना संध्याकाळी आल्यावर ते भांडे दाखविले. आणि म्हणले हे बसवायचे कुठे ते तुम्ही ठरवा. त्यांनी त्यांची मोरी दाखविली चार बाजूला थोड्या मोठ्या आकाराच्या भिंती बांधून मोरी उभी केली होती तसेच संडासही बांधले तर अवघड होईल म्हणून मी दुसऱ्या दिवशी पुन्हा आकाशला घेऊन माझ्या साधारण उंचीच्या चौकटी आणि दरवाजे आणले. आणि आकाशच्या पप्पांना म्हणालो मी पुढच्या वेळी येईपर्यंत आता संडास बाथरूम दोन्ही करून ठेवा. त्यावेळी आकाश च्या घराला रंग देऊन तर पुण्याला पुन्हा आलो. 

बर मी ज्यावेळी गावाला गेलो होतो त्यावेळी बीड मध्ये प्रामुख्याने २०१९ च्या उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला होता. आकाशच्या बैल आणि गाई चारा छावणी मध्ये होते. आकाशच्या वडिलांनी हे सर्व काम आता होणार नाही पावसाळ्यात् होईल असे म्हणून सांगितले. म्हणून मी गावाकडून पुन्हा निघालो हा. नाहीतर मी संडास चे दर्शन घेऊन च निघालो असतो. आकाश जेंव्हा पुण्याला आला तेंव्हा मी त्याला म्हणलं त्या अक्षय कुमार ने त्यांच्या टॉयलेट मध्ये ताजमहाल ची टाईल लावली होती आपण पण लावू. आम्ही चक्क शोधली पण इकडे पुण्यात. पण ताजमहाल नाही मंदिर, मशीद टाईल दिसायच्या. फॅन्सी स्त्री पुरुषांच्या पण दिसायच्या, तो मला उचकवून म्हणायचा ही घेऊयात का? मग माझे उत्तर असायचे त्यांनी बघायला का आपण आत काय करतोय ते...टाईल काही भेटली नाही.

त्या नंतर मी २०२० चा मे महिना संपल्यावर आकाश ला आणायला गावाला गेलो होतो. कोरोना मुळे आकाश चा गावात अभ्यास नव्हता होत म्हणून त्याला पुन्हा पुण्याला घरी आणायचे होते. गेलो आणि बघतो काय मी दिलेलं संडासच भांड आणि चौकटी तसेच धूळ खात पडले होते. मी यावेळी आकडतांडव केल. दुष्काळ मिटला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला गावात संडास बांधायचे होतेच. मी पप्पांना गवंडी , प्लंबर शोधायला लावले. प्लंबर होता साधा बरा. पण पप्पांनी गवंडी बाबा आजम च्या जमान्यातील शोधला. त्याला हे लोक इतका मान द्यायचे, तो म्हणायचे हे घर मी बांधले आहे. त्याच्या फुशारक्या मारण्यात आणि त्याची रेलचेल करण्यात संडास होईल की नाही शंका होती. पप्पांनी यावेळी मला सहकार्य करून संडास बांधण्याचे ठरवले होते. मी त्यांना घेऊन सिमेंट, विटा, फरश्या, पाईप, प्लम्बिंग चे सर्वच साहित्य घेऊन आलो होतो. गवंडी च्या हाताखाली बिगारी देखील तसाच होता. त्याला धड ऐकू पण यायचे नाही. काम करताना हात थरथर कापायचे. तो एक दिवस कामाला आला. पैसे तर पूर्ण घेतले. पण काम काही पुढे जाईना. शेवटी मीच पप्पांना म्हणालो खड्डा खणायचे काम आपण करूयात. मग काय आजी अविनाश आकाश पप्पा आणि मी आम्ही सर्वांनी संडास आणि बाथरूम ला एकत्रित रित्या मिळून खड्डा खणला. दुसऱ्या दिवशी अण्णा म्हणजे तो बाबा आजम गवंडी आला. त्यांच्या पिलदार मिश्या, आणि त्यांचे जेवण करायला बसण्याची अदा हे सर्व पाहून ते इकडे कामाला आलेत की आम्ही त्यांच्या हाताखाली कामाला आहोत हे कळणे अवघड होते. बेस बांधला गेला, भिंती वर गेल्या. मी हळूच पाचशे लिटर ची टाकी आणली. म्हणजे पुढे मागे जर दुष्काळ पडला आणि संडास मध्ये गेलो तर पाणी नाही असे नको व्हायला. प्रश्न असा होता टाकी भरायची कशी. पण जाऊ दे त्याचा विचार करायचा नव्हता.

भिंती वर गेल्या पण भिंतीवर नक्की काय टाकायच हा प्रश्न होता. मी स्पष्ट म्हणालो होतो की भिंतींवर पत्रा टाकायचा नाही. कारण पत्र्यावर टाकी ठेवता येणार नाही हे मला माहिती होते. पण संपूर्ण घरावर पत्रा होता. आणि हे असे. मी त्या अण्णांना विचारले की काय पर्याय आहे. त्यांनी फर्शी ठेवता येईल असा नवीन पर्याय सांगितला जो आमच्याकडून मान्य झाला. तो पर्यंत प्लम्बिंग चे काम करून अण्णांना सुट्टी पाहिजे होती. त्याच दिवशी दोन तीन प्लंबर च्या मुलाखती झाल्या. आणि त्यातला एक निवडला गेला. जो बजेट मध्ये काम करेल.  

हे सर्व करून आता निदान 7 दिवस झाले होते. तो पर्यंत मी आपलं रोज शेतात जायचो. आता सवय झाली होती. हपशा वरच्या बायका आणि कट्ट्यावर च्या पुरुषांकडे बघून मी आता ताठ मानेने पुढे जायचो. मला हातातल्या बादलीची लाज पण नव्हती वाटत. गावातली बरीच मंडळी आमच्या कामाच्या इथे यायचा. तासन तास उभ राहून जायचा. त्यांना खूप भारी वाटायचे. 

आम्ही डॉल्फिन असलेली टाईल निवडली होती. गवंडी त्या टाईल कडे बघून हादरला होता. त्याला ते अवघड वाटलं होत. पण पप्पानी Yes you can do it man..... अशा पद्धतीने त्याला मराठीत खूप प्रोत्साहन दिल होत. संडास मध्ये थोडे डॉल्फिन आणि बाथरूम मध्ये संपूर्ण समुद्र असा लवाजमा होता.

आणखीन् एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे शौचखड्डा. तो छोटा खड्डा नाही तब्बल मोठा सहा फुटी खोल घ्यायचा होता. मी सुरवातीला म्हणालो चला आपण करूयात. पण आम्हाला कोणालाच ते प्रकरण झेपल नाही. शेवटी गावातल्या एकांचा जेसिपी मागविण्यात आला आणि दोन मिनिटांत खड्डा तयार. मग काय कुठे विटा कमी, तर कुठे प्लम्बिंग चे सामान कमी मला अगदी रोज म्हणाल तरी मोठ्या गावाच्या बाजारात जायला लागायचं. 


Saturday, 11 December 2021

साहेब : मनातले मनापासून पंतप्रधान

 साहेब : मनातले मनापासून पंतप्रधान

अलोक पवार

काही वर्षांपासून राजकारण समजायला लागलं. राजकारणातले विविध पैलू समजायला लागले. या संपूर्ण धर्तीवर एक नाव मागच्या ८० वर्षांपासून राज्य करते आहे ते म्हणजे 'पवार' साहेबांचं. कधीतरी मी पवार आहे याचा मला अभिमान प्रचंड वाटतो. हा म्हणजे काही लोक उगाच फुशारकी मारायला आडनावाच्या मागे पाटील, देशमुख लावतात, असतील देखील ते, पण आमचे बस पवार यावर भागून जाते. 

हे नाव मोठं केलंय शरद पवार साहेबांनी. महाराष्ट्रात राजकारण करावे आणि ते जीवापाड जोपासावे हे मोठ्या प्रमाणावर जमले आहे फक्त साहेबांना. महाराष्ट्रात अगदी कमी वयाचा मंत्री ते मुख्यमंत्री, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. प्रत्येक पद सांभाळताना अभ्यास करणे हे त्यांनी सोडले नाही. अगदी छोटे छोटे बारकावे त्यांनी निरखून बघितले. इतकेच काय त्यांनी विरोधक म्हणून देखील आपली भूमिका अगदी चोखंदळपणे मांडली. आणि म्हणूनच त्यांनी ठाकरे सरकार हे अशा प्रकारे उभे केले ज्याचा कोणी स्वप्नातपण विचार केला नसेल. हे सर्व करीत असताना विरोधक नाही तर सत्येत असणाऱ्या सर्वांनी बंड पुकारले. पण काय फक्त शब्द न पाळणाऱ्या सत्ताधारी लोकांना साहेबांनी धडा शिकवला, आणि सगळे गणित जुळवून आणले. काँग्रेस - राष्ट्रवादी ही साथ होतीच पण नेहमी विरोधात बसलेल्या शिवसेनेला देखील मित्र म्हणून बसवले. आणि ही मैत्री इतकी घट्ट बसली की नव्या विरोधकांनी तीन चाकी रिक्षा, एक वर्षांचा खेळ इतकीच नाही अशी नानाविध नावे ठेवली गेली. मात्र याच राजकारणात कोणत्या वक्तव्याकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या वक्तव्याला भीक देखील घालायची नाही हे पवार साहेबांच्या राजकारणी महाविद्यालयात आता सर्वच शिकले आहेत. म्हणून कोरोनासारखे महासंकट असताना देखील अतिशय व्यवस्थित पणे सर्व परिस्थिती अगदी महाराष्ट्र राज्य हे आपले घर आहे याप्रमाणे या महाआघाडी सरकारने सांभाळली. 

दिल्लीचे तक्त्य हलवणारे हे आमचे पवार साहेब. कारण पवार साहेब हे पवार जरी असले तरी ते पॉवर म्हणून समोर येताना दिसते. पवार साहेबांचे पुढचे पाऊल काय असेल कसे असेल हे सांगणे महाकठीण. भविष्य काय असणार आहे हे लगेच कळत नाही पण निर्णय घेतला म्हणजे घेतला, यात महाराष्ट्रात सुरवात केली ती म्हणजे महिलांसाठी आरक्षण. महिला ३३% राजकारणात आल्या. त्याही राजकारण शिकल्या. फक्त चूल आणि मुलं एवढंच बघणाऱ्या स्त्रिया या राजकीय धुरेत सहभागी होवू लागल्या. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी केंद्रात देखील हे महिला धोरण लागू केले. महाराष्ट्र एवढ्यावर थांबले नाही महाराष्ट्र हे पहिले असे राज्य बनले जिथे ५०% महिला आरक्षण सुरू केले आणि या घटनेचा मुखीया म्हणजे आमचे पवार साहेब.

मध्ये तोंडाचा कॅन्सर साहेबांना झाला, बऱ्याच लोकांना मनातून आनंद पण झाला. पण शाहरुख खान याचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ना, "पिश्चर अभि बाकी हे दोस्त...", या युक्तीप्रमाणे पवार एकदम ठणठणीत उभे राहिले.मध्ये वर्तमान पत्र किंवा बातम्यांमध्ये पवार साहेब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले अशी बातमी झळकली. बऱ्याच महाराष्ट्र वासीय या बातमीने हळहळले. मात्र त्यांनतर सकाळी पेपर वाचतानाचा साहेबांचा फोटो बघून जिवंत जीव आला. पावसाच्या भाषणात त्यांनी बोलले की, "मी काय म्हातारा झालोय का? अजून भरपूर लढाया लढायच्या आहेत". हे वाक्य होते ८० वर्षांच्या तरुणाचे.

साहेब काय माहिती पण मागच्या काही वर्षात शरद पवार अगदी अंगात भिनल्यासारखे झाले. श्री शाहू महाविद्यालय, पर्वती, पुणे तर्फे शरद पवार यांच्या आयुष्यावर शोधनिबंध लिहिण्यासाठी स्पर्धा झाली. माझे दुर्दैव म्हणजे मला संदर्भ साहित्य विकत देखीक भेटले नाही. मात्र लढाई करणे हे त्यांच्याकडूनच शिकलो त्यामुळे शोधनिबंध छापून आल्यावर कांग्रेस पार्टी अध्यक्ष यांची पाठीवर शाबासकी मिळाली. घरात मोठी बहीण आणि बायको 'शरद पवार माझ्या शब्दांत' या निबंधात पुरस्कर्ते ठरल्या. तिथे मी निबंध पाठवून मला सहभागी प्रमाणपत्र मिळाल्यावर मला खरी ५०% महिला आरक्षणाची भूमिका उमगली. मध्ये सुप्रियाताई सुळे यांनी आयोजित केलेल्या योद्धा@८० ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली होती. काहीतरी वेगळे करायचे म्हणून शरद पवार यांची स्त्री पुरुष समानता त्यांच्या घरातून कशी सुरवात झाली ते अगदी सुप्रियाताई यांच्या जन्माच्या आधीपासूनच बाप बुलंद कहाणी दाखवली. त्यात मी स्वतः शरद पवार झालो, बायकोला प्रतिभा ताई पवार बनवले. पहिल्यांदाच सगळे दाढीत तू हँडसम दिसतो हे काही नव्याने कळूनही मी पवारांवर शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी दाढी काढली. या सर्वच ठिकाणी पवार अंगात भिनत होते. ते अजूनही समजणे कठीण.

आज पवारांचा ८१ वाढदिवस. साहेब चिरायू होवोत.


Monday, 15 November 2021

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

अलोक पवार

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून आता बरेच वर्ष झाले. हे स्वातंत्र्य कोण्या एकाच्या नाही तर बऱ्याच जणांच्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला प्राप्त झाले. मात्र जेंव्हा आपण या स्वातंत्रांचा विचार करतो तेंव्हा आज अजूनही काही वर्ग हे समाजापासून काही अंशी मागे असे दिसून येतात, ज्यात प्रामुख्याने आदिवासी समाज असूनही आहे दिसून येते. त्यांना शिक्षण, नोकरी यापेक्षाही व्यक्ती म्हणून किंवा निदान मूलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या गोष्टी देखील योग्य वेळी प्राप्त होत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी या सर्व समाजला एक व्यक्तीने खूप जोरदारपणे प्रयत्न केला तो म्हणजे बिरसा मुंडा यांनी.


बिरसा मुंडा हे स्वतः मुंडा या आदिवासी समाजात जन्मलेले. १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये त्यांचा जन्म झारखंड मधील, खुटी जिल्ह्यातील उलिहातू या गावात झाला. जन्माने आदिवासी असलेले बिरसा यांना इतर संप्रदायाला ज्या त्या काळी मिळणाऱ्या सुखसोई होत्या त्या अजिबातच प्राप्त झाल्या नाहीत. आणि त्यातूनही समाज पारतंत्र्यात त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती अवघड होती. त्याकाळी शाळेत प्रवेश घ्यायचा तरी आदिवासी समाजातील मुलांसाठी अशा काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ब्रिटिश कशा प्रकारे आपली पिळवणूक करीत आहेत याचे ज्ञान त्यांना या प्राथमिक शिक्षणातूनच येत गेली. ज्या प्रकारे मिशनरी विद्यालयात शिक्षण घेताना त्यांना आदिवासी समाज किती मागासलेला आहे हे गौरवी करण करून सांगण्यात येऊ लागले तेंव्हा त्यांनी पुन्हा आपल्या आदिवासी समाजात परतले. 

ब्रिटिशांचा त्रास एक बाजूला होताच, दुसऱ्या बाजूला जमीनदार, सावकार, महाजन आणि जहागीरदार या लोकांनी देखील आदिवासींचे शोषण सुरू केले.  आदिवासी लोकांच्या शेतजमिनी देखील हे लोक त्यांच्याकडून कपटी पद्धतीने हस्तक्षेप करून घेऊ लागले. शिक्षणाची व नियमांची माहिती नसल्याने आदिवासी लोक फक्त शोषणाला बळी जात होते. या सर्वांचे नेतृत्व बिरसा यांनी केले. १८९४ मध्ये त्यांनी आदिवासी जमातीचे नेतृत्व करीत जमिनी आणि आपल्या हक्कांच्या विरोधात एका आंदोलनाचे नेतृत्व सरकार विरोधात केले. व याच कालखंडात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातही हल्लाबोल केला.

त्यांनी बऱ्याच ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात महत्वाची भूमिका बजावली. त्या काळच्या ब्रिटिश सरकारने आदिवासींना भडकविण्याच्या बहाण्याने बिरसा मुंडावर ५०० रुपये बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या सामंती प्रणालीचा विरोध केला होता.  जानेवारी १९०० मध्ये डोंबरी नावाच्या गावात या आदिवासी लोकांचा आणि ब्रिटिश लोकांमध्ये एक युद्ध झाले ज्यामध्ये बऱ्याच स्त्रिया आणि लहान मुले देखील मारले गेले. ३ फेब्रुवारी १९०० मध्येच बिरसा यांना अटक झाली. आणि पुढे ९ जून १९०० मध्ये  रांची च्या जेलमध्येच बिरसा यांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडा हे आजही आदिवासी यांच्या लढ्याचे नेतृत्व करीत नसते तर त्यांना त्यांचा हक्क मिळविणारा नेता प्राप्त झाला नसता. आजही आदिवासी समाज इतका पुढारलेला नाही. आपल्या सोबत त्यांनाही स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र शिक्षण, योग्य रोजगार, समाजतील स्थान या सर्वांवर त्यांचा जो हक्क आहे त्या हक्कांना त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बिरसा यांनी सुरवात केली होती. त्याकाळी ब्रिटिश कालीन परिस्थिती होती, मात्र आजही आदिवासी समाज थोडा कुठेतरी मागे दिसतो.

बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल आज जाणून घेतले तर त्यांचे मिशन कुठेतरी आजही चालले पाहिजे असे वाटते. त्यांना आजही बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये देव म्हणून पुजले जाते. त्यांच्या विचारांना अमर उजाळा दिला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त थोडे लिहावेसे वाटले. त्यांच्या कार्याला सलाम. 

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...