माझं आकाश
मला एक फोन आला, "सर अहमदनगर वरून बोलतोय, बीसीए ला ऍडमिशन घ्यायचे आहे, फी किती आहे, सांगा ना". "त्यासाठी कॉलेज ला यावे लागेल मी इकडे आलास की तुला सर्व माहिती दिली", मी फोन वरून लगेच उत्तर दिले. "सर येतो उद्या". मला फोनवरून उगाच मला माहिती विचारून त्रास देतोय असच वाटलं. आणि मी इकडेच ये, आता काय फोनवरूनच ऍडमिशन घेणार का असे बोलून फोन ठेवला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार च्या सुमारास एक सडपातळ बांध्याचा एक मुलगा खरंच आला. आणि मला माहिती विचारू लागला. बीसीए चांगलं ना, काय काय असत त्यात, फी कमी नाही का होणार, तीन वर्ष एवढीच फी ना, अजून काही सोई आहेत का, हॉस्टेल आहे का, शिक्षक कसे आहेत, .... अरे किती प्रश्नच संपत नव्हते. मला मनात वाटले होते हा नगर चा मुलगा अजिबात इथे प्रवेश घेणार नाही. उगाच इथे चौकश्या करायला आलाय.
तिसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चिती केली, आकाश कोल्हे, मूळचा बीड जिह्यातला. पण बारावीचे शिक्षण नगर च्या आत्याकडे झाल्याने तो नगर चा असे म्हणत होता आणि आता पुढच आयुष्य पुणेकर बनण्यासाठी इकडे आला होता. मी कॉलेज च्या पहिल्या दिवशी कमवा आणि शिका योजनेबद्दल् माहिती सांगितली होती, त्या दिवशी लगेच तो माझ्याकडे आला आणि सर मी घेऊ शकतो का हो भाग असे तो म्हणाला. हो नक्कीच, का नाही उत्पन्नाचा दाखला आणून दे आणि घे भाग.
त्याच वर्गाचा मी वर्गशिक्षक देखील होतो. तो नेहमी माझ्या तासाला उशिरा यायचा. मी नेहमी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठा बश्या काढायला लावायचो, तो नेहमी काढायचा. आमच्या कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेच पन्नास विद्यार्थ्यांचे युनिट मान्य झाल. त्याच वर्षी केरळ ला पूर आला होता. मी याचं युनिट ला घेऊन पैसे गोळा करण्याचं काम करत होतो. तेंव्हा सर्वात मागे आळशी राहणारा विद्यार्थी म्हणजे हा आकाश. डोकेफोड किती करायची म्हणून मी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करायचो. डिसेंबर महिन्यात आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर जायचे ठरले. पंचवीस मुलांना घेऊन मी देखील या कॅम्प मध्ये सहभागी झालो होतो. खूप मज्जा केली कॅम्प मध्ये मी सर्व विद्यार्थी काम करत असताना मागे राहायचो. या आकाशला माझ्याबरोबर राहण्याची काय सवय लागली होती काय माहिती. म्हणजे मला फोटो काढण्याचं प्रचंड वेड. म्हणजे मी स्वतःचे फोटो काढायचो, माझ्या फोटोत त्याला देखील घुसायचे असायचे. मला नाही म्हणता आले नाही. कॅम्प वरून आल्यावर् काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या सर तुमच्यामागे असल्याने तुम्हाला दिसायचं नाही पण त्याने काहीच काम नाही केले, नुसता मोबाईल फोन वर असायचा तो.
माझी चुकी मी दुरुस्ती करण्याचे ठरवले. आणि कमवा व शिका योजनेत सहभागी असूनही अजून रोज उशिरा येणाऱ्या आकाश ला पुन्हा उशिरा येण्याचे कारण विचारले. उत्तर काहीच नाही आले. दुसऱ्या दिवशी मलाच उशीर झाला. मी कॉलेज मध्ये पायीचं जातो. मला रस्त्यावर एक दुकानाच्या पायरीवर आकाश ओरिओ चा बिस्कीट पुडा खाताना दिसला. "सर खाणार का?", म्हणजे मी ओरडणार तर हे असे खाणार का विचारले तर कसे ओरडणार. म्हणून, "चल उठ घरून नाश्ता करून येता येत नाही का, इथं बसून हे असल खात बसतो". सर माझे आई वडील नगर ला ना... ( हे तो चक्क खोट बोलला होता) मग नाश्ता का नाही करत तर् सर एवढ्या सकाळी दहाच्या आत कुठे दुकान उघडत नाही.
मला हे उत्तर एकून् अगदी कासावीस झाल्यासारखे वाटले. मी त्याला रोज उशिरा येण्याबद्दल ओरडायचो, उठाबाशी काढायला लावायचो माझा मला राग आला. मी पुढच्या रविवारी माझ्या घरापासून अगदी सकाळी चालत त्याच्या घराकडे पर्वती पर्यंत बघत बघत गेलो, खरंच एकही दुकान नाश्ता किंवा खाऊ साठी उघडे नव्हते. मग मी त्याला घेऊन अगदी सारस बागेच्या तिकडेही बघितले. साडे आठ पर्यंत पण दुकाने बंद होती. मी निरुत्तर झालो होतो. आमच्याच कॉलेज मधल्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडे याने मेस लावली होती. पण तरीही तुझा नाश्त्याच काय, संध्याकाळच्या चहाच काय असे मीच त्याला प्रश्न करायचो. मला संध्याकाळी चार् च्या सुमारास दूध प्यायला यायचे. मी आकाश ला आधी ओरडलेलो म्हणून त्याला चला अर्धा दुधाचा कप संपवा, असा आदेश मी त्याला दिला. दूध आवडत नाही, दूध नको पण माझा अट्टहास त्याच्यापुढे त्याचे काय चालणार म्हणून पिला त्याने अर्धा कप. या दुधाने काय होणार म्हणून मी भरपूर ओरिओ आणि क्रीमची बिस्कीट आणली होती. आता काय माझा ओरडा खाण्यापेक्षा दूध बिस्कीट खाणे परवडायचे. बर हे आमचं सिक्रेट होते बर म्हणजे तो माझ्या दुधातला वाटेकरु होता हे कोणालाच माहिती नव्हते.
थोडया दिवसांनी माझं पीएचडी काम मी सुरु केले. मला माहिती गोळा करण्यासाठी बाहेर जावे लागायचे. मी आकाश ला माझ्या सोबत घेऊन जायचो. त्याची मिनी पिकनिक पण व्हायची मला पण मदत व्हायची. त्याच कामासाठी मी महाविद्यालयात जास्त वेळ बसायचो. एक दिवस आकाशने मला विचारले सर मी पण कॉलेज मध्ये बसू का अभ्यासाला. तुम्ही बसता तेवढ्या वेळ. माझ्या केबिन ची सोडून बाकी जवाबदारी मला टाळायची असल्याने मी त्याला बस माझ्याच केबिनमध्ये असे बोललो. कधी माझ्या केबिनचा सोफा त्याची अभ्यासाची जागा झाली कळलेच नाही. अगदीच मला त्रास होऊ नये म्हणून मांजरीच्या चोरपावलाने यायचा आणि अभ्यासाला बसायचा. परीक्षा आली की बाहेर फेऱ्या मारत वाचन करायचा, मला म्हणायचा माझी पद्धती आहे अशीच. मला त्याचे हे अभ्यास करणे प्रकरण खूप मनापासून आवडायचे. आपण त्याला पुढे नेऊ शकतो का आपण त्यावर आणखीन कष्ट कसे घेऊ शकतो हे माझ्या डोक्यात सतत चालू लागले. तो त्याच्या स्वभावाने मला स्वतःकडे आकर्षित करून घेत होता नकळत.
एकदा मला त्याचा पुढचा एक दात किडलेला असा वाटला. मी त्याला म्हणालो काय हे दात किडायचे काय वय आहे का हे, चल डॉक्टर कडे जाऊ आणि मी त्याला खरेच घेऊन गेलो, डॉक्टरने चार सेशन मध्ये रूट कनेल करायला सांगितले. मी त्याला काही न विचारता सुरु करा असे सांगितले. उगाच चालू आहे हे सगळं असे त्याला वाटायचे. कारण त्याला तसा त्रास नव्हता पण मी किडलेला दात समोर म्हणून भविष्यात काही त्रास नको असे म्हणून याची सुरवात केली. मग त्याला प्रत्येक सेशन नंतर आईसस्क्रीम खाऊ घालण्याची जवाबदारी पण माझी होती. सेशन चालू असताना आ ऊ करायचा पण सेशन झाल्यावर फरक बघितल्यावर त्याला अगदी जीवात जीव आला. मी त्याला त्या नंतर नेहमी म्हणायचो तो दात माझा आहे बरका सांभाळून ठेव.
आता इथून पुढे त्याच जे राष्ट्रीय सेवा योजनेमधील मागे पडलेले कर्तृत्व आहे ते देखील थोडे वर आणायचे होते. विद्यार्थ्यांच्या मनात तो जे आळशी होता ती प्रतिमा चांगली करायची होती. यावेळी मी त्याला अगदी बसवून राष्ट्रीय सेवा योजनेच गणित सांगितले होते. देशाच्या फायद्यासोबत तु देखील उत्कृष्ट स्वयंसेवक बनू शकतोस फक्त प्रत्येक योजनेत् सहभागी हो. उत्तर लगेच "हो" आले पण मला एवढे हो बोलून ऐकायचे नव्हते मला प्रॉमिस पाहिजे होते तेही लेखी. म्हणून मी सर्व करून दाखवेल हे लेखी प्रॉमिस घेऊन त्याची त्यावर सही घेतली होती. तो प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत होता. एक नवीन परिपत्रक आले की सव्वीस जानेवारीच्या राष्ट्रीय परेड साठी विद्यार्थी निवडीसाठी. रोज फिजिकलं फिटनेस ची बाळासाहेबांना अजिबात प्रॅक्टिस नव्हती. पण मी जाणार असे त्याने फिक्स केले.
मी आकाशसोबत कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे त्यात खंड नसावा म्हणून पुण्यातल्या त्याच्या रूममेट सर्वांचा नंबर घेतला मला अगदी दोन दिवस आधी त्याच्या एका रूम मेट चा फोन आला. सर आकाश ची तब्बेत खराब झाली आहे. उलटी आणि चक्कर आल्यासारखे वाटते आहे त्याला. मी तो पुढे काही बोलेल याच्या आतच येतो मी तिकडे. नेमका रविवार होता. सर्व दवाखाने बंद होते. आकाश ला खूप जास्त ताप आला होता, अंगात त्राण नसल्यासारखे झाले होते. माझी एक डॉक्टर मैत्रीण माझ्या घराजवळ राहत होती. मी त्याला तिच्याकडे त्याला घेऊन गेलो. त्याला एक इंजेक्शन आणि सलाईन तीने तिच्या घरीच लावले. त्याची अवस्था बघता मी मनात उद्याचे कदाचित सिलेक्शन आता हातातून गेले. त्याच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवून ताप जातोय का हे मी बघत होतो. गोळ्यांचा पण असर होत होता. रात्र गेली दुसऱ्या दिवशी आकाश मला स्वतःहून उठून म्हणाला सर जायचे ना? डोळे खोल गेले होते. ताप नव्हता पण काल सलाईन आणि इंजेक्शन घेतलेला आकाश मला म्हणत होता चला नाहीतर दुसऱ्याची निवड होईल. कसलीही प्रॅक्टिस नाही, एक दिवस आधी असे आजारपण पण मनातून उत्साह असल्यामुळे मी हो म्हणालो. अगदी लहान बाळाला तयार करतात तसे मी त्याला चल शंबो करा, त्याला नाश्ता देऊन डोक्यावर टोपी घालून रेडी केल. आणि टू व्हीलर वर घेऊन गेलो. आकाश तिथले सर्व टास्क करत होता पण कालचे आजारपणाचं शरीर साथ नव्हतं देत. माझ्या दृष्टिकोनातून तो सहभाग पुरेसा होता. निवड नाही झाली. मी त्याला समजावून सांगितलं जाऊ दे पुढे भविष्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री तुला स्वतःहून बोलावून घेतील.
आकाशच आजारपण पाहून तो थोडासा नाजूक वाटला, पण तो अजिबात तसा नव्हता. म्हणजे गावाची हवा आणि पोष्टिक अन्न हे त्याच्या नसानसातून वाहत होत. पण त्या क्षणापासून त्याची काळजी अधिकाधिक वाटत होती. मग त्याला माझा पीएचडी आणि त्याचा अभ्यास झाल्यावर घरी जाण्यासाठी बस साठी सोडवायला जाणे, त्याची बस येईपर्यंत तिथे थांबणे हे मी स्वत नियमित करायचो.
आकाश जसा माझ्याकडे यायचा तस माझ्याकडून् त्याने हे केल पाहिजे ते केल पाहिजे या अपेक्षा प्रचंड वाढू लागल्या होत्या. मी त्याच्यासोबत ई कॉमर्स शिकवत असताना त्याला घेऊन एक रिसर्च पेपर लिहिला. आणि एक महाविद्यालयात जाऊन तो प्रकाशित पण केला. तो त्याच नाव त्या प्रकाशनावर पाहून भलताच खुश झाला होता. मग त्याने स्वतने सर आपण अजून लिहुयात का असे संशोधन पेपर हे मला विचारले. मग काय आपण तीन वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लिहुयात हे करता करता आम्ही जेजुरी, अहमदनगर, रत्नागिरी, कोल्हापूर सगळीकडे पेपर्स लिहिले. आकाशचे फक्त महाविद्यालयातील दीड वर्ष पूर्ण झाले होते. पण चांगल्या दर्जाचे पेपर लिहून झाले होते. त्याच्या गावाला म्हणजे बीड ला कॉन्फरन्स असेल तर आम्ही आवर्जून जायचो. आम्ही दोनदा बीड ला गेल होतो. नोंदणी करणाऱ्या शिक्षिका गावातील असल्याने त्यांनी आकाश ला ओळखले मग त्याने माझी ओळख करून देखील दिली. आकाशला त्यांनी सांगितले, आकाश सरांना अजिबात सोडू नकोस, असे मार्गदर्शक नेहमी भेटत नाहीत. ती एक युजीसी तर्फे आयोजित कॉन्फरन्स होती आणि मी व आकाश ने नॅक मधील मेंटोर - मेन्टी ही संकल्पना यावर संशोधन पेपर लिहिला होता. आम्ही जाणून बुझून एकसारखा शर्ट आणि पँटदेखील घातले होते. मला तेथील सर्व शिक्षक विद्यार्थी समजत होते. पण ओळख करून दिल्यावर त्या सर्वांना आमचा रिसर्च पेपर देखील आवडला. माझ्या पेपर ला तर ट्रॉफी सुद्धा दिली. आकाश पक्का खुश झाला होता. आम्ही जेजुरी ला गेल्यावर खंडोबाचे, कोल्हापूर ला गेल्यावर महालक्ष्मीचे, नगर गेल्यावर शिर्डीच्या साईबाबांचे तर बीड ला गेल्यावर रामाचे दर्शन घेतले. सोबत आकाश होता.मी त्याच्या उत्कृष्ठ गुणांसाठी मागणी करायचो सर्व देवांकडे. जेजुरीला तर मागणी थेट पूर्ण झाली होती. आकाश चा तिसऱ्या सेम चा निकाल तिथे कॉन्फरन्स मध्येच लागला. त्याला बरेच भारी गुण मिळाले होते. ज्या विषयात सर्वांना मार्क कमी पडतात त्यामध्ये त्याला शंभर पैकी शंभर गुण पडले होते. मला राहवले न गेल्यामुळे मी लगेच जेजुरीच्या महाविद्यालयातील प्राचार्या मॅडम ला सांगितले, त्यांनी लगेच त्याचा सत्कार केला. हा त्याच्या सत्काराबरोबर माझा देखील आंतरिक सत्कार होता.
तो द्वितीय वर्षामध्ये असताना एक सरकार कडून जाहीर करण्यात आले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये तात्काळ बंद करा, आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवून द्या. आकाश माझ्यासाठी माझ्या नात्यापेक्षाही महत्वाचा वाटू लागला होता. त्याची मी अगदी मुलासारखी काळजी घेत असल्याने मी त्याला आवर आणि निघ म्हणालो. मग मी ऑनलाईन पद्धतीने शिकवायला सुरवात केली होती.
मी त्याच्या भाड्याच्या घरून त्याचे कपडे त्याचे सामान, त्याच्या मित्रांशी अगदी भांडून माझ्या घरी आणून ठेवले होते. ऐन कोरोनामध्ये मी हे सगळे केले.
एक महिना अगदी व्यवस्थित गेला. पण हा कोरोन जायचे नाव घेईना. मी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना आकाश कधीतरी गायब व्हायचा आणि मग त्याचा फोन गायब सर्व बंद. मी घरच्या सर्वांना फोन लावून बघितला तरीही कोणाचा फोन लागेना. एक दिवस गेला दोन दिवस गेले. आकाश तासाला अजिबातच बसत नव्हता. पाच सहा दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन लागला आणि ते म्हणाले की इथे सहा दिवस लाईट गेली आहे. डीपी खराब आहे. या अशा परिस्थिती मध्ये अभ्यास कसा होणार. जी पहिला येण्याची स्वप्न आकाश ने बघितली आहेत ती पूर्ण कशी होणार. त्याच्या स्वप्न बघण्याने ती स्वप्न माझी पण झाली होती. माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातले होते. माझ्याकडे बीड कॉन्फरन्स च्या वेळी तिथले आमदार भेटले होते, त्याचा नंबर होता. तिथली नायब तहसीलदार पण माझी विद्यार्थ्यांनी होती. मी लगेच दोघांना फोन लावला पण काहीच फायदा झाला नाही. जोपर्यंत स्मार्ट फोन चार्ज नव्हता होत तोपर्यंत आकाश लेक्चर ला बसणार नव्हता. मग माझ्याकडे गावातल्या अजून एक सरांचा नंबर होता. त्यांची शाळा त्यांच्या गावाच्या पुढच्या गावात होती. मी त्यांना विनंती केली, की आकाश ला शाळेत मोबाईल चार्ज करून तेथेच बसू दे का? शाळेला देखील सुट्ट्या होत्या, आणि त्यात माझे विचारणे म्हणजे तुमच्या मुलांना शाळेला सुट्टी न मग माझ्या मुलाला तिथे बसवा. मी अगदी हट्टाने सरांशी बोलत होतो. सरांनी आकाशवरचे माझे प्रेम, त्याचे नुकसान होऊ नये म्हणून माझी आस्था म्हणून लगेचच हो बोलले. पण पुढील काही दिवसात कोरोनाचे प्रमाण इतके वाढले की तो शाळा देखील संपूर्ण पणे बंद ठेवण्यात आलेली होती.
पुन्हा काही दिवसांनी गावातील डीपी ला प्रोब्लेम झाला. यावेळी मी म्हणालो चला आकाशला त्याच्या घरून घेऊन येऊ. मला जाणे तितके सहज सोप्पे नव्हते. मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आणि सुप्रिया सुळे यांच्या सहाय्यक् यांच्या मदतीने डॉक्टर चे प्रमाणपत्र काढले आणि थेट गाव गाठले. आकाश ला घेऊनच यायचे हा चंग बांधला. यावेळी आकाश माझ्या घरीच राहणार. त्याची पदवी मिळेपर्यंत तो माझ्या घरीच राहणार हा मी निश्चय केला. और मेरा वाचन ही था मेरा शासन. आकाश ला माझ्या घरी अजिबातच रहायचे नव्हते. पण माझ्या पुढे चालतंय कोणाचं. तेंव्हा त्याची बिषाद.नाही नाही म्हणता रुळला. मग त्याला नाश्ता करून खाऊ घालणे, जेवण व्यवस्थित होते की नाही, त्याचा बेड आवरणे सर्व नैतिक जवाबदारी म्हणून मी करत होतो. मला चक्क एक बाळ सांभाळल्यासारखे.वाटत होते. आणि कधी आकाश माझा मनुडी, बाबुडी, मना झाला कळलं नाही. तोही मी मनु म्हणालो की ओ दयायाचा. त्याचा अभ्यास, त्याचा प्रोजेक्ट मी अगदी भन्नाट करून घेतला होता. कोणाची बिषाद एक तरी मार्क्स कमी करायची होईल. त्याला म्हणालो की सध्या कोरोना चालू आहे त्यावर आधारित प्रोजेक्त करू. एकदम भारी झाला होता प्रोजेक्ट.
टॉयलेट : आमची लव्हस्टोरी
मी २०१९ मध्ये सर्वप्रथम आकाशच्या गावाला त्याच्या वाढदिवसाला गेलो होतो. घरी पोहोचल्यावर गावाला केक भेटत नसेलच म्हणून मी घरून केक बनविण्याचे साहित्य पण घेतले होते. माझ्या माऊ ला मस्त कपडे पण घेऊन गेलो होतो. गावाला केक बनविला आणि आकाशच्या आईला सांगितले की बोलवा आकाशच्या मित्रांना. आणि काही बायकांना त्याला ओवाळायला. संध्याकाळी बऱ्याच जणी आल्या. प्रत्येकीने आकाशला ओवाळले आणि आकाशला इतके गिफ्ट मिळाले, प्रत्येक बाईने आकाश ला पारले जी चा पुडा दिला होता. काही लहान मुलांनी पण त्याला तेच गिफ्ट दिले. मला लई भारी वाटले.
या सर्व गोष्टींमध्ये मी हळूच इकडे तिकडे बघत होतो. म्हणजे टॉयलेट शोधण्याचा प्रयत्न करत होतो. खूप वेळ झाल्यावर मी काकूळतेने आकाश ला विचारले आकाश टॉयलेट कुठे आहे. आकाश ने मस्त उत्तर दिले सर मे महिना चालू आहे. शाळेचे टॉयलेट बंद असते. माझं डोक फिरत चाललं होत. अरे मग काय तुम्ही सर्व जण मे महिन्यात टॉयलेट ला जात नाही. सर समोर बघा आपली शेती आहे. जा तिकडे. मी तर यापूर्वी कोठे बाहेर बाथरूम् ला पण गेलो नव्हतो. हा मला चक्क टॉयलेट ला बाहेर जा म्हणतोय. तो उठला. त्याने बादली भरली आणि मला म्हणाला जा. जा म्हणताना तिथे त्याचा भाऊ, आज्जी, आई सगळे जण होते. मला खूप लाजल्यासारखे झाले होते. त्यामुळे तिथून जाणे भाग होते. तरी दबक्या आवाजाने मी त्याला विचारले आकाश गावातल्या तुझ्या एखाद्या मित्राकडे आहे का रे टॉयलेट. नाही ओ अख्या गावातच कोणाकडे टॉयलेट नाही. मी बादली उचलली आणि समोरून चालायला लागलो. तिथे समोर हपश्यावर काही बायका पाणी भरत होत्या. शाळेच्या कट्ट्यावर काही जेष्ठ मंडळी बसली होती. मला लाजल्याहून लाजल्यासारखे झाले होते. म्हणजे मी गावागावात जाऊन उघड्यावर शौच बंद करा म्हणणारा मास्तर आणि मी स्वतः आज उघड्यावर संडास ला जाणार होतो. मी जसा जसा पुढे जातोय तसे मला माझ्याकडे बघून काही जण स्मित हास्य देत होते. हातातली पाण्याची बादली मला लाजल्याहून लाजल्यासारखी करत होती. मी निर्लज्ज सारखे शेताकडे गेलो जरा लांब जाव आडोसा बघावा आणि बसावे असे म्हणून बसलो. थोडासा आवाज जरी झाला तरी मला विचित्र वाटत होते. मी आलो घरी. मला घरी आलो की आकाश ला खाऊ की गिळू असे झाले होते. मी घरी आल्यावर तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने हसून बघत होता. मी त्याला पुन्हा विचारले होती. कोणाकडेच टॉयलेट नाही. शेत असताना टॉयलेट कशाला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्या टॉयलेट चे रूपांतर घरातले गोडाऊन म्हणून केले होते. मला गावातल हे विदारक सत्य स्वीकारायचे होते. म्हणजे मला अजून काही दिवस त्या गावात काढायचे होते. मी नुकताच अक्षय कुमार चा टॉयलेट एक लव्हस्टोरी हा चित्रपट बघितला होता. म्हणजे महाराष्ट्र किती सुंदर जेथे मी राहतो आपल्याकडे सर्वत्र संडास आहेत. मोदींनी हर घर शौचालय अशी मोहीम काढली लोकांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. आणि महाराष्ट्रात तर असतीलच ही माझी समज साफ चुकीची निघाली. मी आकाश ला घेऊन गावात फेरफटका मारला. कोणाकडेच संडास नव्हती. हा गावात कुठे खराब पण दिसत नव्हते. आकाश त्यावर म्हणायचा प्रत्येक जण आपापल्या शेतात जातो. स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळी सोय असते. पण सर्वजण उघड्यावर.
मला सर्व अवघड होते. मला ज्या विद्यार्थ्याला शिकवायचे होते, त्या विद्यार्थ्याला घेऊन मी बाजारातून एक संडासचे भांडे आणले. त्याने माझ्या होला फक्त हो करायचे होते. मी त्याच्या वडिलांना संध्याकाळी आल्यावर ते भांडे दाखविले. आणि म्हणले हे बसवायचे कुठे ते तुम्ही ठरवा. त्यांनी त्यांची मोरी दाखविली चार बाजूला थोड्या मोठ्या आकाराच्या भिंती बांधून मोरी उभी केली होती तसेच संडासही बांधले तर अवघड होईल म्हणून मी दुसऱ्या दिवशी पुन्हा आकाशला घेऊन माझ्या साधारण उंचीच्या चौकटी आणि दरवाजे आणले. आणि आकाशच्या पप्पांना म्हणालो मी पुढच्या वेळी येईपर्यंत आता संडास बाथरूम दोन्ही करून ठेवा. त्यावेळी आकाश च्या घराला रंग देऊन तर पुण्याला पुन्हा आलो.
बर मी ज्यावेळी गावाला गेलो होतो त्यावेळी बीड मध्ये प्रामुख्याने २०१९ च्या उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला होता. आकाशच्या बैल आणि गाई चारा छावणी मध्ये होते. आकाशच्या वडिलांनी हे सर्व काम आता होणार नाही पावसाळ्यात् होईल असे म्हणून सांगितले. म्हणून मी गावाकडून पुन्हा निघालो हा. नाहीतर मी संडास चे दर्शन घेऊन च निघालो असतो. आकाश जेंव्हा पुण्याला आला तेंव्हा मी त्याला म्हणलं त्या अक्षय कुमार ने त्यांच्या टॉयलेट मध्ये ताजमहाल ची टाईल लावली होती आपण पण लावू. आम्ही चक्क शोधली पण इकडे पुण्यात. पण ताजमहाल नाही मंदिर, मशीद टाईल दिसायच्या. फॅन्सी स्त्री पुरुषांच्या पण दिसायच्या, तो मला उचकवून म्हणायचा ही घेऊयात का? मग माझे उत्तर असायचे त्यांनी बघायला का आपण आत काय करतोय ते...टाईल काही भेटली नाही.
त्या नंतर मी २०२० चा मे महिना संपल्यावर आकाश ला आणायला गावाला गेलो होतो. कोरोना मुळे आकाश चा गावात अभ्यास नव्हता होत म्हणून त्याला पुन्हा पुण्याला घरी आणायचे होते. गेलो आणि बघतो काय मी दिलेलं संडासच भांड आणि चौकटी तसेच धूळ खात पडले होते. मी यावेळी आकडतांडव केल. दुष्काळ मिटला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला गावात संडास बांधायचे होतेच. मी पप्पांना गवंडी , प्लंबर शोधायला लावले. प्लंबर होता साधा बरा. पण पप्पांनी गवंडी बाबा आजम च्या जमान्यातील शोधला. त्याला हे लोक इतका मान द्यायचे, तो म्हणायचे हे घर मी बांधले आहे. त्याच्या फुशारक्या मारण्यात आणि त्याची रेलचेल करण्यात संडास होईल की नाही शंका होती. पप्पांनी यावेळी मला सहकार्य करून संडास बांधण्याचे ठरवले होते. मी त्यांना घेऊन सिमेंट, विटा, फरश्या, पाईप, प्लम्बिंग चे सर्वच साहित्य घेऊन आलो होतो. गवंडी च्या हाताखाली बिगारी देखील तसाच होता. त्याला धड ऐकू पण यायचे नाही. काम करताना हात थरथर कापायचे. तो एक दिवस कामाला आला. पैसे तर पूर्ण घेतले. पण काम काही पुढे जाईना. शेवटी मीच पप्पांना म्हणालो खड्डा खणायचे काम आपण करूयात. मग काय आजी अविनाश आकाश पप्पा आणि मी आम्ही सर्वांनी संडास आणि बाथरूम ला एकत्रित रित्या मिळून खड्डा खणला. दुसऱ्या दिवशी अण्णा म्हणजे तो बाबा आजम गवंडी आला. त्यांच्या पिलदार मिश्या, आणि त्यांचे जेवण करायला बसण्याची अदा हे सर्व पाहून ते इकडे कामाला आलेत की आम्ही त्यांच्या हाताखाली कामाला आहोत हे कळणे अवघड होते. बेस बांधला गेला, भिंती वर गेल्या. मी हळूच पाचशे लिटर ची टाकी आणली. म्हणजे पुढे मागे जर दुष्काळ पडला आणि संडास मध्ये गेलो तर पाणी नाही असे नको व्हायला. प्रश्न असा होता टाकी भरायची कशी. पण जाऊ दे त्याचा विचार करायचा नव्हता.
भिंती वर गेल्या पण भिंतीवर नक्की काय टाकायच हा प्रश्न होता. मी स्पष्ट म्हणालो होतो की भिंतींवर पत्रा टाकायचा नाही. कारण पत्र्यावर टाकी ठेवता येणार नाही हे मला माहिती होते. पण संपूर्ण घरावर पत्रा होता. आणि हे असे. मी त्या अण्णांना विचारले की काय पर्याय आहे. त्यांनी फर्शी ठेवता येईल असा नवीन पर्याय सांगितला जो आमच्याकडून मान्य झाला. तो पर्यंत प्लम्बिंग चे काम करून अण्णांना सुट्टी पाहिजे होती. त्याच दिवशी दोन तीन प्लंबर च्या मुलाखती झाल्या. आणि त्यातला एक निवडला गेला. जो बजेट मध्ये काम करेल.
हे सर्व करून आता निदान 7 दिवस झाले होते. तो पर्यंत मी आपलं रोज शेतात जायचो. आता सवय झाली होती. हपशा वरच्या बायका आणि कट्ट्यावर च्या पुरुषांकडे बघून मी आता ताठ मानेने पुढे जायचो. मला हातातल्या बादलीची लाज पण नव्हती वाटत. गावातली बरीच मंडळी आमच्या कामाच्या इथे यायचा. तासन तास उभ राहून जायचा. त्यांना खूप भारी वाटायचे.
आम्ही डॉल्फिन असलेली टाईल निवडली होती. गवंडी त्या टाईल कडे बघून हादरला होता. त्याला ते अवघड वाटलं होत. पण पप्पानी Yes you can do it man..... अशा पद्धतीने त्याला मराठीत खूप प्रोत्साहन दिल होत. संडास मध्ये थोडे डॉल्फिन आणि बाथरूम मध्ये संपूर्ण समुद्र असा लवाजमा होता.
आणखीन् एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे शौचखड्डा. तो छोटा खड्डा नाही तब्बल मोठा सहा फुटी खोल घ्यायचा होता. मी सुरवातीला म्हणालो चला आपण करूयात. पण आम्हाला कोणालाच ते प्रकरण झेपल नाही. शेवटी गावातल्या एकांचा जेसिपी मागविण्यात आला आणि दोन मिनिटांत खड्डा तयार. मग काय कुठे विटा कमी, तर कुठे प्लम्बिंग चे सामान कमी मला अगदी रोज म्हणाल तरी मोठ्या गावाच्या बाजारात जायला लागायचं.
No comments:
Post a Comment