Thursday, 13 April 2023

आकाश निळं बाबासाहेबांमुळं

 आकाश निळं बाबासाहेबांमुळं 

डॉ. अलोक पवार

सध्या पुण्यात, पुण्यात काय महाराष्ट्रात, भारतात भीम गर्जना होते आहे. का तर काही लोक म्हणतात, "आमच्या बापाची जयंती येते आहे". अहो बापच म्हणायचा कारण आई आणि वडिलांच्या जनुकांच्या जीवावर पोर जन्म घेत, आई - वडील लेकराला वाढवतात, त्याला खाऊ पिऊ घालून मोठ करतात, शिकवतात, त्याला समाजात वावरण्यासाठी काबील बनवतात. हे लेकरासाठी कोण करत आई आणि बाप. बाप बाहेर कष्ट करतो लेकरासाठी ढोर मेहनेत घेतो. मग हा वेगळा बाप.. त्याची जयंती एवढी जंगी...अहो दादा हा आमच्या बापाचा पण बाप आहे, आमच्या आज्याचा पण बाप आहे. आमच्या सर्वांचा बाप आहे. आणि त्याने आमच्यासाठी करूनच ठेवलं आहे सर्व जे आमच्या कित्येक पिढ्यांसाठी खाण्याची सोय असेल, शिक्षणाची सोय असेल, नोकरी धंद्याची सोय असेल आणि समाजात वावरण्याची सोय असेल सगळी सेटिंग करून ठेवली आहे. ती सेटिंग इतकी मोठी आहे की आमचे बांधव जेंव्हा भीम गर्जना देतात न, "आकाश निळं आमच्या बाबासाहेबांमुळं..." म्हणजे एवढं मोठ पसरलेलं आकाश, ते आणि या बाबासाहेब आणि आकाशातला निळा रंग जो रंग बाबासाहेबांच्या ध्वजाला पण आहे या सर्वांचा नक्की संबंध काय आहे ते जाणून घेण्यासाठीचा हा लेख. 



एका ताईंची हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी चालू होती. हॉस्पिटल हे कॉलेजशी संबंधित असल्याने डॉक्टरांच्या टीम सोबत शिकवू विद्यार्थी सुद्धा ऑपरेशन थिएटर मध्ये होते. ताईंना मुलगी झाली. सिजेरियन प्रक्रिया पार पडली होती. मुलीचा आकार अगदी बारीक असल्याने तिला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. सिजर झाल्याने त्या ताई बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोन तासांनी जस जसे इंजेक्शन चा असर कमी होत होता ताईंना अतिशय वेदना होत होत्या. ताई अगदी जोर जोरात ओरडू लागल्या. डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी पाहिले, तपासले तेंव्हा त्यांना कळले ताईंच्या पोटात अजूनही बाळ वाढवण्यासाठी जे गर्भजलं लागते त्याचा बराच भाग अजूनही पोटात आहे. ते जर बाहेर आले नाही तर त्याचे विष होईल आणि ताई त्वरित जाऊ देखील शकतील. ताई वाचल्या. ताईंच्या पोटातील काही भाग आता ताईंचा राहिला नव्हता. तो काढला आणि ते विष संपलं.

नीट समजून घ्या या गोष्टीचा संदर्भ आणि बाबासाहेबांच्या पर्यंतच्या लोकांनी नक्की काय पाहिलं होत. नेहमी सांगितलं जात, आधीच्या काळात मनुस्मृतीच्या धर्तीवर चार वर्ण होते, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सर्वांसाठी सगळं वेगवेगळ. ब्राम्हण म्हणजे शिक्षणाचे भांडार. या भांडाराचे लाभ घेणारे ब्राम्हण आणि क्षत्रिय पुरुष. स्त्रिया नाही. फक्त ब्राम्हण व राजेशाही घराण्यातील क्षत्रिय पुरुष. ब्राम्हण स्त्रिया व क्षत्रिय स्त्रिया या म्हणजे घरंदाज स्त्रिया, डोक्यावर पदर, हातात चुल आणि पदरी मूल. वैश्य यांच्याकडे व्यापार व ब्राम्हण, तसेच क्षत्रियांच्या बऱ्याच कामांची जवाबदारी असायची. शेवटचा वर्ण म्हणजेच शूद्र. छे म्हणजे यांनी जन्मच का घ्यावा? आणि तुम्ही घेतला आहे जन्म तर तुमचा हा जो तुमच्या नाकाद्वारे श्वास चालू आहे तो पण आमच्यामुळे. अशी काहींची धारणा होती. तुम्ही चालताय जमिनीवर आणि तुम्ही जेथून जाताल तेथे तुमची पावलं उमटतील आणि त्या पावलांवरून आम्ही चालायचं, म्हणजे तुमच्या पावलांनी अपवित्र झालेली जमीन त्यावरून आम्ही चाललो म्हणजे आमचा धर्म बुडाला. या पवित्र्याने तुम्ही पायात जोडे घालायचे नाहीतच शिवाय बुडाला नेहमी मागच्या बाजूने झाडू लावून ठेवायचं. अहो माकडाचा जेंव्हा माणूस झाला तेंव्हा त्याची शेपटी झडली हो. पण या दडपशाहीने एक नवीन शेपटी या बांधवांच्या मागे आली होती. त्या ताईला पोर जन्मल्यावर नको असलेलं गर्भजलं पोटात असल्यावर च्या तीन तासासाठी मरण यातना झाल्या त्याच मरण यातना या बांधवांना कायम आपल्या बुडाला तो झाडू लावून पुढे जाताना होत होत्या. वर बघायची खोटी. सर्व खालच्या दर्जाची कामे या समाजाला. म्हणजे हाताने माणसाचे मलमूत्र असलेले गटार साफ करा, लाकडे तोडा, फोडा, एखादा घरचा प्राणी मेला की त्याची विल्हेवाट लावा, त्याची कातडी काढा.... ही फक्त आणि फक्त खालच्या दर्जाची कामे. ही कामे करताना फक्त खाली आणि खालीच बघायचे. मग त्यांनी कधी वर बघितलेच नाही हो. त्यांनी बघितली ती काळी माती, त्यांनी बघितली ती मेल्या जनावरांची कातडी, त्यांनी बघितले ते गटारातून वाहणारे काळे पाणी. तुम्ही त्यांना कधी वर बघूच दिले नाही. मग वर आकाश असते, त्यात सूर्य असतो, चंद्र असतो, तारे ग्रह हे त्यांनी कधी बघितलंच नाही हो. का तर ही माणसे विष अगदी उराशी घेऊन फक्त जगत होते. बाबासाहेबांनी हे सर्व पाहिलं, अनुभवलं. आणि जणू हे सर्व बदलण्याचा ध्यासच घेतला. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "अन्याय करण्याऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो". हे त्यांचे वाक्यच मोठी ठिणगी पेटवणारे होते. अजून किती दिवस अन्याय सहन करणार. त्यांना मोठा बदल अपेक्षित होता. हा बदल एक दिवसात घडणारा नव्हता. 

हा बदल कोणासाठी होता? मला असे वाटते खरे हा प्रश्न आणि त्याचे उत्तर हे नीट समजून घेतले पाहिजे. काही लोक म्हणतील अरे काय केल आंबेडकरांनी आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी. त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठी शूद्र किंवा schedule Caste साठी केलंय. हो त्यांच्यासाठी तर केलच म्हणून तर ते बापाची जयंती साजरी करणार आहेत. मात्र तो सर्वांचाच बाप म्हणावा लागणार आहे कारण बापच असा माणूस असतो जो त्याचा लेकरांसाठी प्रॉपर्टी ठेवून जातो. म्हणून तो बाप समजून घ्यावा लागतो. आपण शिकतो, आणि शिकून बड्या पगाराची नोकरी करतो. ही नोकरी ढोर मेहनतीने नाही करत. बारा बारा तासांची नोकरी आता आपण नाही करत. कार्यालयांच्या वेळा नियमाप्रमाणे फक्त ८ तास असाव्यात, त्यावर कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये, हे झाले आपल्या बाबासाहेबांमुळे. नाहीतर अजूनही आपण बारा तास राबलो असतो. आणि हो हे फक्त एका ठराविक जातीतल्या लोकांसाठी नाही तर सकळ भारत वासियांसाठी होते. आधीच्या काळी वेतन देण्याची सुविधा ही देखील आठवडी होती. इंग्रजांच्या काळात ही आठवडी सुविधा मासिक वेतनाची झाली. मासिक पगार मिळायला लागल्यापासून तब्बल ४ आठवडे म्हणजे एका महिन्याचा पगार कमी भेटतो आहे हे अभ्यासाने दाखवून दिल्यावर एका आठवड्याचा पगार बोनस म्हणून द्यावा आणि तो बोनस दिवाळी सारख्या सणाला दिला जावा हे देखील बाबासाहेबांनी म्हणलं. म्हणजे आपल्या ज्या कामावरच्या वेलफेअर स्किम्स आहेत ना त्या बाबासाहेबांनी घट्ट रुजवल्यात. बर हे फक्त एका जातीपुरत्या मर्यादित नाही केल तर सर्वांसाठी केल.

बाबासाहेबांना समानता पाहिजे होती. या राज्यात कोणी दुजा होता कामा नये त्यांचे म्हणणे होते. त्यांचे असे म्हणणे होते की जर, "असा धर्म मानतात जो समानता, स्वतंत्रता आणि बंधुता शिकवतो". त्यामुळे आज आपण जेंव्हा हक्काची लढाई लढतो, ती ज्या कायद्यावर चालते मुळात आपण आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे त्या कायद्यांचा रचेता जो आहे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मग जेंव्हा एखादा व्यक्ती कोर्टात दाद मागायला जातो मग तो कोणत्या जातीचा असो त्याला न्याय मिळत असेल तर त्याने लक्षात घ्यावे, ही न्यायव्यवस्था भरभक्कम आपल्या बाबासाहेबांनी केली आहे. चुकीचा न्याय भेटला असता तर आपणही जेल मध्ये गेली असतो, ती काळी अंधारी खोली बघितली असती. आणि खुल निळ आकाश बघायला मुकलो असतो.

बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे फक्त मागासवर्गीय व्यक्तीच नाही तर सर्वांनाच या निळ्या आकाशाच्या छताखाली समानतेने राहायची संधी प्राप्त झाली आहे. आंबेडकरांनी जेंव्हा राजकारणात यायचा विचार केला समता दलाच्या माध्यमातून त्यांनी सुरवात केली व पुढे रिपब्लिबकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली त्यामध्ये जो झेंडा वापरला गेला त्यातही निळ्या रंगाच्या झेंड्याचा वापर झाला तो झेंडा देखील तुम्ही आम्ही एक समान आहोत या प्रतिकाने ते दर्शविले गेले. 

त्यामुळे आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे आपल्याला जे फक्त खाली बघून फक्त निस्तेज जमीन ज्यावर आपल्याला फक्त घाणीचे सामाज्य पसरले आहे, जिथे फक्त गटार गंगा वाहत आहेत, जिथे काळ्या कोठड्या आहेत, जिथे फक्त मृतदेह पडले आहेत, जिथे उत्तम अशी न्यायव्यवस्था नाही त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात पाहिले ताठ मानेने जगायला शिकवले. चुकी नसताना खाली बघणाऱ्यांना एक आत्मविश्वास दिला आणि त्यातूनच आपल्याला या निळ्या आकाशाची प्राप्ती करून दिल्यामुळेच आज हा रंग आपण बघितला. म्हणूनच मी म्हणतो आकाश निळं बाबासाहेबामुळं....


No comments:

Post a Comment

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...